मुक्ताईनगर तालुक्यात फसवणूक करणार्‍या टोळ्या कार्यरत : सोशल मिडीयावरून शोधतात सावज

नागमणी, मांडूळ साप, काळ्या हळदीने धन प्राप्तीचा गोड गैरसमज : पोलीस यंत्रणांनी घ्यावी दखल

मुक्ताईनगर (नितीन कासार) : गुप्त धन मिळण्यासाठी काळ्या हळदी, मर्क्युरी, दुतोंडी मांडूळ साप आदी वस्तू विक्रीच्या करणार्‍या टोळ्या तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मुंबईसह पुणे व राज्यातील अनेक भागातील सावज सोशल मिडीयाद्वारे हेरून त्यांना जंगलात बोलवायचे व मारहाण करून लुटायचे हा या टोळ्यांचा गोरखधंदा आहे. जीव वाचला म्हणून अनेक जण पोलिसातही जात नाही मात्र तीन दिवसांपूर्वी माजी सैनिकाचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर या टोळ्यांची कार्यपद्धत्ती पुन्हा ऐरणीवर आली आहे.

सावज हेरून लुटण्याचा प्रकार
फेसबूक तसेच सोशल मिडीयावरून नागमणी, काळी हळद, मर्क्युरी, दुतोंडी मांडूळ साप आदींची स्वस्तात विक्री करण्याच्या बहाण्याने ग्राहकाला गोड बोलून मुक्ताईनगर परीसरात बोलावयचे व तेथून लांब अंतरावरील जंगलात नेवून टोळीतील सदस्य संबंधिताना मारहाण करून लूटतात, असा हा एकून प्रकार आहे. यापूर्वी अनेक टोळीतील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करून अटकदेखील करण्यात आली आहे मात्र जामिनावर सुटल्यानंतर टोळ्या पूर्ववत आपले उद्योग सुरूच ठेवत असल्याचे चित्र आतापर्यंत पहायला मिळून येते.

माजी सैनिकाच्या मृत्यूने खळबळ
कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील (52, सावर्डे बु.॥, ता.कागल, जि.कोल्हापूर) व अनिल आनंदा निकम (41) यांनी शेगाव दर्शनाचा बेत केल्यानंतर शुक्रवार, 5 नोव्हेंबर रोजी निघाले होते मात्र नांदुरा येथून त्यांचे ओळखीच्या पवार नामक इसमाने अपहरण करीत जंगलात नेले व टोळक्यांनी केलेल्या मारहाणीत प्रल्हाद पाटील यांचा मृत्यू ओढवला. आरोपींनी घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत उभयंतांना पुलाखाली फेकले होते. अनिल निकम यांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर सुरूवातीला नांदुरा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मुक्ताईनगर पोलिसात वर्ग करण्यात आला. या घटनेत लुटमार हा मुद्दा पुढे आला असलातरी दोघेही मांडूळ व्यवहारासाठी या भागात आल्याची चर्चा चांगलीच रंगताना दिसून आली.

पोलीस प्रशासनाने वचक निर्माण करावा
मुंबईसह राज्यभरातील सावजांना मुक्ताईनगर तालुक्यातील जंगलात लुटल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षात मुक्ताईनगर तालुक्यात घडल्या आहेत. या प्रकरणी अनेक गुन्ह्यांची नोंदही पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील गुन्हेगार पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाहीत या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आता कठोर कारवाई करण्याची गरज आहे शिवाय नव्याने गुन्हे घडू नयेत यासाठी देखील प्रयत्न करावेत, अशी माफक अपेक्षा सुज्ञ जनतेतून व्यक्त होत आहे.