मुक्ताईनगर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघा हरणांचा मृत्यू

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील व्याघ्र अधिवासक्षेत्र ‘मुक्ताई भवानी’ अभायारण्यात डोलारखेडालगत एक हरीण शनिवारी सकाळी 11 वाजता मृतावस्थेत आढळले तर पिंप्रीपंचम येथील नाल्यात दुसरे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नायगाव फाट्यानजीक असलेल्या शेती शिवारातील विहिरीत एक हरीण पडले असल्याची माहिती पथकाने विहिरीत पडलेल्या हरणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

हल्ल्यामुळे हरणांच्या मृत्यूचा संशय
पिंप्रीपंचम नियतक्षेत्रातील नाल्यावर तसेच दक्षिण डोलारखेडा नियतक्षेत्रातील पूर्णा नदी पुलाजवळ भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने दोन्ही घटनेत हरणांचा हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. दोन्ही घटनेतील मृत हरणांचा पंचनामा करून त्यांच्यावर डोलारखेडा येथील वनकर्मचारी निवासस्थान भागात अंत्यसंस्कार करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.डुघ्रेकर, डॉ.चव्हाण, परीचालक सुरवाडे यांनी तत्पूर्वी शवविच्छेदन केले. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, वनपाल डी.जी.पाचपांडे, वनरक्षक दीपाली बेलदार, वनरक्षक विकास पाटील, वनमजूर तुकाराम गवळी, अशोक पाटील, योगेश कोळी, पिंजारी, महेंद्र पुरकर यांच्यासह डोलारखेडा ग्रामस्थांची उपस्थिती होती.