मुक्ताईनगर । तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठापोटी वीज वितरण कंपनीची सुमारे 9 कोटी 38 लाख एवढी थकबाकी असल्याने त्यापोटी 52 गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. इतकेच नव्हे तर 131 नळजोडणीचे वीज कनेक्शनही तात्पुरते खंडीत करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीद्वारा सदर मोहीम राबवित असतांना वडोदा येथे एका कर्मचार्यास मारहाण झाल्याची घटना घडल्याचे समजते.
शासकीय कार्यालयांकडे वळविणार मोर्चा
मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यातील 82 गावांचा पाणीपुरवठा मुक्ताईनगर येथील पुर्णा नदीपात्रातून सुरु आहे. त्यापैकी मुक्ताईनगर तालुक्यात कुर्हा, अंतुर्ली, कर्की, उचंदा, वडोदा, मुक्ताईनगर शहर, कोथळी व चांगदेव अशा आठ कक्षातील 52 गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन असून त्यापोटी 9 कोटी 38 लाख एवढी वीज वितरण कंपनीची थकबाकी आहे. त्यामुळे 8 कक्षातील 52 गावांमधील आज 131 नळजोडणीचे वीज कनेक्शन तात्पुरते खंडीत करण्यात आले. सदर मोहिमेंतर्गत कारवाई चालूच राहणार असल्याचे समजते. मुक्ताईनगर तालुक्यात घरगुती, औद्योगिक व वाणिज्य आदींचे ग्राहकांची अंदाजे संख्या 7 हजार असून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यानंतर शासकीय कार्यालये यांच्याकडे वीज वितरण कंपनी मोर्चा वळविणार असल्याचे समजते.
ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
दरम्यान, वीजबिलापोटी थकबाकी असल्याने ती थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वितरण मंडळातर्फे मोेहिम राबविण्यात येत असून त्यात गरजेनुसार वीज पुरवठा खंडीतही करण्यात येत आहे. याचा परिणाम संबंधित गावातील पाणी पुरवठ्यात होत असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मात्र ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठ्याअभावी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून अशीच कारवाई मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथे करीत असतांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यास मारहाण झाल्याची घटना घडली.