मुक्ताईनगर नगरपंचायतीत विषय समिती सभापती बिनविरोध

शिवसेनेला चार तर खडसे समर्थकासह एका पदावर सभापतीपदाची संधी : ‘दैनिक जनशक्ती’चे वृत्त ठरले खरे

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या स्थायी व पाच समितीच्या सदस्यांची निवड 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. निवड झालेल्या विषय सदस्यांमधून गुरुवारी विषय समिती सभापतीपदांची निवड तहसीलदार श्वेता संचेती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत करण्यात आली. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यत विषय सभापती पदासाठी नामनिर्देशन दाखल आले. पाचही सभापती पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने विषय सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड व कार्यालयीन अधीक्षक दीपक अग्रवाल उपस्थित होते.

तीन नगरसेवकांनी मारली दांडी
नगरपंचायतीतील राजकीय चित्र बदलले असून शिवसेनेचे 10 सदस्य असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांचे भूमिकेकडे लक्ष्य लागुन होते. गुरूवारी झालेल्या विषय सभापती निवडीत पाच पैकी चार सभापती शिवसेनेचे तर भाजपाचे तिकीटावर निवडून आलेल्या व आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक असलेल्या प्रभारी नगराध्यक्षा तथा उपनराध्यक्षा मनिषा पाटील यांच्याकडे शिक्षण व क्रीडा सांकृतिक कार्य सभापती पद गेलेले आहे. दोन नगरसेविका, एक नगरसेवक निवड प्रक्रीयेवेळी गैरहजर होते.

अनधिकृत बांधकामांना परवानगी नाही
पालिकेकडे रीतसर परवानगी घेवूनच बांधकामे करावीत, अनधिकृत बांधकामांची परवानगी मिळणार नाही. शहरातील अनधिकृत बांधकामे संदर्भात सर्वानुमते ठराव केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम सभापती संतोष मराठे यांनी सांगितले. शहरासाठी 28 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाली असून या योजनेला वाढीव करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे यांनी सांगितले.

यांची लागली विषय सभापतीपदी वर्णी
सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी नगरसेवक तथा शिवसेनेचे उपगटनेता संतोष मराठे, शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक कार्य सभापतीपदी प्रभारी नगराध्यक्षा मनिषा प्रवीण पाटील, पाणीपुरवठा व जलनिसा:रण सभापतीपदी मुकेश वानखेडे, महिला व बालकल्याण सभापतीपदी सविता सुभाष भलभले, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी नुसरतबी मेहबुबखान यांची बिनविरोध निवड झाली.

यांची निवडीप्रसंगी उपस्थिती
उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष मनीषा पाटील, गटनेता निलेश शिरसाट, गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे, संतोष कोळी, पियुष मोरे, संतोष मराठे, शे.शकील खाटीक, नगरसेविका सविता भलभले, शबाना बी.अब्दुल आरीफ, बिल्कीस बी.अमाउल्ला खान, नुसरत बी.महेबूब खान, साधना ससाणे, कुंदा पाटील, ललित महाजन, डॉ.प्रदीप पाटील उपस्थित होते.