मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी

0

मुक्ताईनगर- जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी शुक्रवार, 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी साठी एकुण सहा टेबल लावण्यात येणार असून 18 प्रमुख कर्मचारी, सहा अतिरिक्त कर्मचारी, चार संगणक, 10 इतर कर्मचारी तसेच पाचोरा, जामनेर व भुसावळ येथील महसूल व नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागामार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपनिरीक्षक हेमंत कडुकार, सचिन इंगळे, कैलास भारसके, वंदना सोनोने या प्रमुख अधिकार्‍यांसह 100 पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती पोलीस विभागामार्फत करण्यात आलेली आहे. त्याव्यतिरिक्त जळगाव येथील दोन दंगा नियंत्रण पथके शहरात कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त कर्मचार्‍यांमध्ये 10 होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारते? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 21 हजार 330 मतदारांपैकी 13 हजार 965 मतदारांनी हक्क बजावला होता तर 65.47 टक्के मतदान झाले. नगराध्यक्ष पदाचे तीन व 17 नगरसेवक जागेसाठी उभ्या असलेल्या 72 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद असू कोण-कोण विजयी होणार याकडे आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सुरुवातीला नगराध्यक्ष पदासह प्रत्येक प्रभागातील ईव्हीएममधून मतमोजणी होईल. सर्वात शेवटी नगराध्यक्ष पदाचा निकाल लागेल. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, सहायक तथा मुख्याधिकारी सोमनाथ आढाव काम पाहत आहे.