तक्रारीला नगरपंचायत प्रशासनाकडून केराची टोपली
मुक्ताईनगर- शहराच्या नगरपंचायत निवडणुकीला दिड महिना उलटला असून गत आठवड्यात उपनराध्यक्ष पदाची निवडही झाली मात्र अद्यापही शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद असल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे. याबाबत नागरीकांनी वारंवार तक्रारी करुनही नगरपंचायत प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने प्रभाग 12 चे शिवसेना नगरसेवक संतोष मराठे यांनी मुख्याधिकार्यांकडे प्रभागासह शहरात तत्काळ पथदिवे बसवा, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे . गत डिसेंबर 2017 मध्ये शहराच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. नंतर येथील कार्यभार प्रशासकाच्या ताब्यात गेल्यामुळे कर्मचार्यांतर्फे हेतूपुरस्कर नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याचाच भाग म्हणून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शहरातील काही महत्वाच्या भागातील व गल्ली-बोळातील पथदिवे बंद पडलेले आहेत. याबाबत नागरीकांनी वारंवार लेखी तक्रारी तसेच पालिकेला सुचना देवूनही संबंधीतांनी याबाबत दुर्लक्ष करीत निवडणूक होऊ द्या, अशी उडवा-उडवीची उत्तरे दिली मात्र आता निवडणुका आटपून दिड महिन्याचा कालावधी उलटला आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी पदभार स्विकारला आहे. अशा परीस्थितीत नागरीकांना पुन्हा नगरपंचायतीद्वारा पथदिवे लावण्यास अडचणी दाखविल्या जात आहे. मुळात निवडणुक काळात पन्नास ते साठ लाख रुपये कर वसुली झाली असतांना व नागरीकांकडून पथदिव्यांचा कर वसुल केल्यावर सुद्धा का अडचण दाखविली जात आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.