मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रयाण

0

जळगाव। नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर येथून 7 जून रोजी गाजत वाजत मुक्ताबाई, रामनामाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. मुक्ताबाई पालखीचे पुजन करुन नंतर पंढरी महात्म्यभजन होऊन पालखी, श्रीराम मंदिर, भोईटे गढी, कोल्हे वाडा, श्री सद्गुरु बाबजी महाराज समाधी मंदिर गोपाळपुरा, विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, पांझरापोळ चौक, जोशी पेठ, पंत नगर मार्गे श्री सद्गुरु अप्पा महाराज समाधी मंदिर येथे सांगता करण्यात आली. ही पालखी बुधवारी रात्री अप्पा महाराज समाधी येथे मुक्कामास होती. पालखीचे नेतृत्व मंगेश महाराज जोशी यांनी केले. नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी श्री क्षेत्र पंढरपुर येथे आषाढी यात्रेकरीता सालाबादाप्रमाणे यंदाही जळगाव येथून येत्या 8 जूनला श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान होणार आहे.

मान्यवरांच्या हस्ते होणार पूजन
श्रीराम मंदिर परीसरातील पालखी मार्गातील प्रत्येक नागरीक यावेळी पालखीचे दर्शन घेत होता. श्री सदगुरु अप्पा महाराज समाधी मंदिर येथे मुक्काम करण्यात आले. भोजन प्रसाद संजय कुळकर्णी यांच्या कडून देण्यात आला. 8 जून रोजी वटपौर्णिमेला सकाळी 8 वाजता पंढरपूर येथे जाणार्‍या श्रीराम उत्सव मूर्ती व संत मुक्ताईच्या पादुका तसेच संत आप्पा महाराज समाधी स्थळावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,आमदार सुरेश भोळे,जिल्हापरिषद अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या हस्ते पूजा अर्चना होणार आहे. पालखी प्रस्थान करताना कवरराम चौक,पंचमुख हनुमान मंदिर,सिंधी कॉलनी,इच्छादेवी मंदिर,शिरसोली नाका मार्गे श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

वारकरी संप्रदाय सहभागी
मेहरूण गाव शिवारात संत मुक्ताईपादुका मंदिराचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते पूजन करुन वारकरी संप्रदायाचे भजन होऊन श्री संत मुक्ताई, श्रीराम पालखीचे पंढरपूरकडे प्रयाण करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील व जिल्ह्यातील असंख्य तरुण व ज्येष्ठ मंडळी सहभाग घेणार आहे. श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प मंगेश महाराज जोशी यांच्या सह विश्वस्त मंडळी पालखी सोहळ्यात असणार आहे. यामध्ये नंदू शुक्ल,अरुण धर्माधिकारी,कारभारी गव्हाणे, पोपट महाजन, जीतेद्र वारके, सखाराम वाघ, अनिल कोळी, केशव बारी, सुनील भंडारी, चंदू कासार , सुनील शिंपी, तुषार न्हावी, सुपडू तेली, दत्तू सुतार, देवेंद्र साखरे, मिलिंद भंडारी यांच्यासह असंख्य वारकरी मंडळी मुक्ताई सेवेत दाखल झाले होते.