जळगाव। मुक्ताई शुगर अॅन्ड एनर्जी लि.घोडसगाव ता.मुक्ताईनगर कारखान्याला जळगाव जिल्हा बँकेकडून 51 कोटी रुपये कर्ज मंजूर केलेली रक्कम हि नियमबाह्य असल्याचा असून कारखान्याला यंत्रसामुग्री आधुनिकीकरण व 12.0 मे.वॅट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी 51 कोटी 25 लाख रुपये मध्यम मुदत कर्ज नियमबाह्य मंजूर करण्यात आले. या कर्जमंजूरीच्या पात्रतेसाठी कारखान्याच्या पदाधिकार्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावातील सर्व कागदपत्रांची सत्यता पडताळणीची खात्री करावी, जिल्हा बँक प्रशासनाने कारखान्याच्या बाबत 18 नकारात्मक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आहे. मुक्ताई शुगर अॅन्ड एनर्जी लि.घोडसगाव ता.मुक्ताईनगर कारखान्याचे साखर वाईस चेअरमन सध्याच्या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा आहेत. यामुळे कर्जमंजूरी प्रकरणात मोठा घोळ असल्याचा आरोप जिल्हाबँक व्यवस्थापक देशमुख यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देऊन करण्यात आला.
कर्ज तातडीने रद्द करण्याची शिवसेनेची जिल्हा बँक व्यवस्थापकांना निवेदन
महाराष्ट्रासह संबंध जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकर्यांना पिक कर्ज वितरीत करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतांना जिल्हा बँक मात्र अध्यक्ष व संचालकांचे हितसंबंध जोपासत असून शेतकर्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. या कारखान्याच्या कंपनीचे अधिकृत भागभांडवल 30 सप्टेंबर 2016 अखेर 30 कोटी 5 लाख रुपये दाखविलेले आहे. त्याची पडताळणी व्हावी. तसेच कारखाना मागील 5 ते 6 गाळप हंगामात कधीही पूर्ण क्षमतेने चाललेला नाही. प्रकल्प अहवालात सन 2016-17 चे गाळप 2,10,000 मे.टन अपेक्षित होते. मात्र यावर्षात कारखाना फक्त 38,532 मे.टन ऊस गाळप करु शकला. यावरुन येणार्या वर्षभरात प्रकल्प अहवालात नमूद गाळप होईल. प्रशासनाने 18 नकारात्मक मुद्दे कर्जमंजूरी देतांना विचारात घेतलेले नसल्याने शेतकर्याचे नुकसान यात होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शेतकर्यांचे नुकसान टाळा
कारखाना डबघाईस आल्यास शेतकरी सभासदांचे व जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडून डबघाईस जाण्याची शक्यता असल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व मुक्ताई साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन या एकाच व्यक्तीचे हितसंबंध जोपासणारे कर्ज तातडीने रद्द करुन शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेनेतर्फे शेतकर्यासह शिवसेनास्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.