मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा मुक्ताईनगरात जोमात तयारी

0

बॅनर, पताका व तोरणांनी सजले शहर : भाविकांना गंगाफळाच्या भाजीसह शिर्‍याचा प्रसाद

मुक्ताईनगर- भेदाभेद व जातीयवाद अंधश्रध्देला थारा न देणार्‍या वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार व प्रसार अधिकाधिक होवून व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा या सद्हेतूने श्री संत मुक्ताबाई संस्थान अग्रेसर असते. त्याचाच भाग म्हणून श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा आषाढी एकादशीस विठूरायाचे दर्शन करून परतवारी आगमन करीत असून पंचक्रोशीतील ग्रामवासीयांकडून भव्य स्वागत करण्यात येणार आहे. प्रसंगी वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 104 मंडळानी सहभागी होण्यासाठी नावे नोंदणी केली आहे.

पालखीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी
श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी येथून प्रदीर्घ 309 वर्षापासून परंपरेने पंढरीला आपल्या लवाजम्यासह विठूरायाच्या भेटीसाठी गेलेल्या मुक्ताबाई पालखी 60 दिवसात तब्बल एक हजार 400 किलोमीटरचा प्रवास करीत गुरूवारी 16 ऑगस्ट रोजी स्वगृही आगमन करीत आहे. यावेळी मुक्ताईनगर कोथळी सालबर्डी व पंचक्रोशीतील गावकरी मंडळी जोरदार स्वागत करणार आहेत. शहरात अदभूतपूर्व स्वागत होण्यासाठी बॅनर पताका, गुढ्या, तोरणे उभारण्याची तयारी सुरू आहे तसेच पालखी मार्गात वारकरी भाविकांना ठिकठिकाणी चहापान फराळ वाटपासाठी नियोजन करण्यात आले आहे. मुक्ताईनगर कोथळी सालबर्डी व हरताळे सातोड निमखेडी सारोळा या गावातील प्रत्येक घराघरातून 1 लाखावर पोळीभाकरी संकलित करून एकत्रीत काला करीत सकाळी नवीन मंदिरात व दुपारी जुने मंदिर, कोथळी येथे 25-30 हजार भाविकांना दोन वेळा पोळी, गंगाफळाची भाजी व शिर्‍याचे महाप्रसाद दिला जाणार आहे. याकामी सेवाभावी संस्था मंडळ फाऊंडेशन व गावकरी कार्यरत आहेत.

तीन गटात होणार स्पर्धा
आगमन सोहळा उत्सव समितीच्या आवाहनानुसार 103 भजनी मंडळांनी सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केली आहे . बालगट- 9 दिंड्या , महिलागट 51 दिंड्या व पुरूष गटात 44 दिंड्यांची नोंद झाली आहे. यात जळगाव, बर्‍हाणपूर, बुलढाणा, अकोला अमरावती जिल्ह्यातील भजनी मंडळ सहभागी होत आहे. प्रत्येक गटात तीन बक्षिसे असून सहभागी सर्व दिंड्याना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे. नरेंद्र नारखेडे, भावराव महाराज पाटील , दीपक महाराज पाटील परीक्षक तर समन्वयक काळे सर, मलकापूर आहेत.

असा आहे पालखी मार्ग
नवीन मुक्ताबाई मंदिरापासून सकाळी पालखी उत्सवाला सुरुवात होईल. मुक्ताई चौक, बस बसस्थानक, भुसावळ रोड, गजानन महाराज मंदिरमार्गे जुने मंदिरावर पालखी पोहोचेल. दरम्यान, पालखी सोहळ्यात सहभागी होवून वारकर्‍यानां सेवा द्यावा, असे आवाहन मुक्ताईनगर, सालबर्डी , कोथळी व पंचक्रोशीतील गावकरी मंडळ, पालखी आगमन सोहळा उत्सव समिती, वारकरी सेवा संस्था व संत मुक्ताबाई संस्थानकडून करण्यात आले आहे.