अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, या अपेक्षेपोटी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात आपली मते टाकणार्या राज्यातील द्वितीय क्रमांच्या वंजारी समाजाचा भाजपकडून अपेक्षाभंग झाला असतानाच, राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या रुपाने तरी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार होईल, अशी अपेक्षा वंजारी समाजाला होती. परंतु, अहमदनगर येथे बोलताना स्वतः धनंजय मुंडे यांनीच 2019 साली सत्ता परिवर्तन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येईल व अजित पवारच मुख्यमंत्री होतील, असे विधान केल्याने समाजाचा पुन्हा एकवेळ अपेक्षाभंग झाला आहे. पंकजांना पक्षांतर्गत राजकारणात डावलले जात असल्याने समाजाने धनंजय मुंडेंच्या पाठीशी ताकद उभी केली होती. नाही पंकजा तर धनूभाऊ तरी मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, मुंडेंच्याच विधानाने निवडणुकीपूर्वीच समाजाला मोठा धक्का बसला. राज्यातील 40 मतदारसंघात आमदार निवडून आणण्याची ताकद वंजारी समाजात असून, 28 मतदारसंघात वंजारी समाजाची निर्णायक मते आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पंकजा किंवा धनूभाऊ यांच्या रुपाने साकार व्हावे, अशी समाजाची अपेक्षा आहे.
स्व. गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय चालविण्याची आशा
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, की 2019 साली राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार आहे. तेव्हा पक्षाचे नेते अजित पवार हेच प्रमुख असतील. त्यामुळे मुंडे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नसतील ही बाब आपसूकच स्पष्ट झाली आहे. सद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे हे स्टार प्रचारक असून, त्यांची मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला ऊर्जितावस्था आणली आहे. विधानपरिषदेत तर त्यांनी सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे. वंजारी समाजानेही पंकजा मुंडे यांच्यापेक्षा धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली स्वतःला एकवटणे सुरु केले आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणात पंकजांना शह देण्यात येत असल्याने त्या मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत हे स्पष्ट झाले आहे. तर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालविताना धनंजय मुंडे हेच मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकतात, अशी शक्यता समाजाच्या मनात निर्माण झाली होती. परंतु, आता जेव्हा स्वतः धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रिपदाची दावेदारी सोडली, तेव्हा मात्र समाजाला जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे वळलेला वंजारी समाज पुन्हा एकवेळ भाजपच्या वळचणीला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अच्छे दिन गावोगावी चेष्टेचा विषय!
नगर येथे बोलताना धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. जनता साडेतीन वर्षांपासून अच्छे दिनची वाट पाहात आहेत. मात्र अच्छे दिन म्हणजे आता गावोगावी चेष्टेचा विषय बनला आहे. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घातले आहे. याच फडणवीस यांनी 2014 साली आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र साडेतीन वर्षे ते सत्तेत असूनही आतापर्यंत एकही आरोप सिद्ध झालेला नाही. तीन वर्षात फडणवीस यांना आम्ही सरकारच्या 11 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. मात्र फडणवीस यांनी त्या सर्वांना क्लिनचिट दिली, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.