अहमदनगर : मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी अगोदर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणे घेणे नाही. ते वेळ आल्यावर बघू, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. एक, दोन निवडणुका जिंकल्याने हुरळून जाण्याची गरज नाही, राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर मुक्ती मिळाली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. व्यासपीठावर केवळ महाराजांचा पुतळा ठेवून त्यांचे मावळे होता येत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसंच राम मंदिर होणारच, असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. श्रीरामपूरमधील शिवसेनेच्या शेतकरी संवाद मेळाव्यात मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांना प्रातनिधिक स्वरुपात मोफत बियाणे वाटप केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यातील दुष्काळी भागाचा पाहाणी दौरा करत आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. उद्धव ठाकरेंसह मंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.