महापौरांसह जिल्हाधिकार्यांनी केले स्वागत ; धरणगावच्या कार्यक्रमानंतर भुसावळात लावणार हजेरी
जळगाव- राज्याचे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांचे गुरुवार, 21 रोजी जळगाव विमानतळावर आगमन झाले. प्रसंगी महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
धरणगावनंतर भुसावळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
दरम्यान, मुख्यमंत्री धरणगाव रेल्वे स्थानकासमोरील क्रांतीकारी ख्वाजा नाईक स्मृती संस्थेतर्फे होणार्या जनजाती मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाही भैय्याजी जोशी मार्गदर्शन करणार आहेत तर भुसावळला दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांच्या उद्घाटन होणार आहे. आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर होणार्या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यासह खासदार रक्षा खडसे यांच्या ‘समर्पण’ या कार्यवृत्तांताचे प्रकाशन, सावद्यासह निंभोरा व बोदवड येथील रेल्वे ब्रीजचे ऑनलाईन उद्घाटन तसेच नगरपालिका उद्यानाचे लोकार्पण, प्रशासकीय ईमारतीचे व आमदार निधीतील उद्यानाचे रीमोटद्वारे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री करणार असून त्यानंतर दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत.