भोपाळ-मध्य प्रदेशात १५ वर्षांनंतर भाजपची सत्ता गेली आहे. सर्वाधिक जागा मिळवत काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया स्पर्धा सुरु आहे. दरम्यान मध्य प्रदेश काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आज याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी घोषणा करतील असे सांगितले जात आहे.
भोपाळमध्ये विधिमंडळाच्या झालेल्या बैठकीत कमलनाथ यांच्या नावाला सर्व आमदारांनी सहमती दर्शवल्याचे सांगितले जात आहे. उद्या दुपारी कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे देखील सांगण्यात येत आहे.
कमलनाथ यांच्या मंत्रीमंडळात एकूण ३४ मंत्र्यांचा समावेश असेल. सज्जन सिंह वर्मा, तुलसी सिलावट, जीतू पटवारी, आरिफ अकील, विजय लक्ष्मी साधो, केपी सिंह, बाला बच्चन, गोविंद राजपूत, इमरती देवी, सचिन यादव, कमलेश्वर पटेल, हिना कावरे, तरुण भानोट, लक्ष्मण सिंह, एनपी प्रजापति, दीपक सक्सेना, संजय शर्मा (तेंदुखेडा), झूमा सोलंकी यांचे नाव जवळपास निश्चित आहे.