धनंजय मुंडे यांची राज्य सरकारला इशारा
मुंबई : सरकारने लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. परिणामी राज्याचा विकास झाला नाही. त्यामुळे या फसव्या सरकारचा सध्याचा कारभार पाहता असे म्हणावेसे वाटत आहे की मुख्यमंत्री साहेब, तुमचा काऊंटडाउन आता सुरू झाला आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधीपक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीत चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यप्रवक्ते नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते.
राज्य सरकारची कर्जमाफी फसवी
आम्ही विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात हल्लाबोल यात्रा काढली. सरकार म्हणते की, आम्ही कर्जमाफी केली. मात्र, या दौर्यात एकही शेतकरी ऐतिहासिक कर्जमाफीचा लाभार्थी सापडला नाही. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी आहे. या बाबतीत मुख्यमंत्री सत्य काय आहे, ते सांगणार का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. सरकारने बोंडअळीबाबत मदत जाहीर केली होती. मात्र अद्यापही शेतकर्यांना ती मदत मिळाली नाही. ती घोषणाही फसवी आहे. शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी सरकार काही भूमिका घेत नाही. आज बांधावरचा शेतकरी मंत्रालयात येऊन आत्महत्या करत आहे. धर्मा पाटील यांच्या कुटुंबाला 56 लाखांची मदत देऊ, असेही सरकारमधील लोक म्हणत होते. मात्र ही मदत देण्याच्या दृष्टीने एक टक्काही प्रक्रिया सुरू झालेली नाही, असे ते म्हणाले.