मुख्यमंत्र्यांचा दौरा निव्वळ फार्स ; खडसे समर्थकांची निराशा

0

एकनाथराव खडसेंचे पुर्नवसन नाहीच ; खासदार रक्षा खडसेंना मात्र दिलासा

भुसावळ (गणेश वाघ)- तब्बल तीनवेळा रद्द झालेला मुख्यमंत्र्यांचा दौरा चौथ्यांदा यशस्वी झाला असलातरी जिल्हा दौर्‍यात त्यांनी कुठलीही मोठी घोषणा न केल्याने हा दौरा निव्वळ फार्स ठरला. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंच्या पुर्नवसनासह त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर मिळालेल्या क्लीनचीटविषयी मुख्यमंत्री काही बोलतील, अशी खडसेंप्रेमींची अपेक्षा भंग पावली तर खासदार रक्षा खडसे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी आगामी उमेदवार त्याच असणार असल्याचे अप्रत्यक्ष भाषणातून शिक्कामोर्तबही केल्याने तिकीट कापले जाणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला. नाशिकच्या आंदोलनामुळे भुसावळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आले नसलेतरी महाजन समर्थकांनी भुसावळात टाळलेली हजेरी भाजपातील दोन बड्या नेत्यातील दुही सांगून गेली.

मुख्यमंत्र्यांच्या दौरा ठरला केवळ फार्स
भाजपा सत्तेत आल्यानंतर तब्बल साडेचार वर्षानंतर भुसावळात येत असलेले मुख्यमंत्री काहीतरी ठोस घोषणा करून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावतील, अशी सार्‍यांनाच असलेली अपेक्षा फोल ठरली. देशभरात पंतप्रधान आवास योजना राबवली जात असताना त्यांनी भुसावळकरांना पाच हजार घरे देण्याचे आश्‍वासन हा तर योजनेचा भाग झाला तर स्व.मधुकरराव चौधरी यांनी 1984 मध्येच मेगारीचार्ज संकल्पना मांडल्यानंतर अद्यापही त्याचा डीपीआर मंजूर झाला नसल्याने मुख्यमंत्र्यांनी केवळ योजना मंजूर करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. मुळात आमदार हरीभाऊ जावळे गेल्या 20 वर्षांपासून या योजनेच्या मंजुरीसाठी एकांगी लढा देत आहेत, भविष्यात या योजनेचे काम मार्गी लागल्यास त्याचे सर्व श्रेय आमदार जावळेंना असेल यात शंका नसावी !

खडसे ठरले केवळ मार्गदर्शक
विविध आरोपांमुळे मंत्री मंडळातून अडीच वर्षांपासून बाहेर असलेल्या एकनाथराव खडसेंबद्दल मुख्यमंत्री या दौर्‍यात ठोस काहीतरी बोलून त्यांचे पुर्नवसन करतील, अशी खडसे समर्थकांसह जिल्हावासीयांना अपेक्षा होती मात्र फडणवीस यांनी खडसेंविषयी काहीही बोलणे टाळले. खडसे आमचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक असल्याचे भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सांगून खडसे केवळ आता मार्गदर्शनापुरते नेते उरले असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले. मध्यंतरीच्या काळात सरकारवर नाराज असलेल्या खडसेंनी सरकारला विविध प्रश्‍न उपस्थित करून अडचणीत आणले होते तर मध्यंतरीच्या काळात खडसेंना पक्षाने जवळदेखील केले. अर्थात खडसेंकडे ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पाहिले जाते शिवाय त्यांचा तेव्हढा दबदबादेखील असल्याचे नाकारून चालणार नाही त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पक्षाने ही बाब हेरल्याचे नाकारता येत नाही.

गटबाजीचे पुन्हा प्रदर्शन
नाशिकच्या आंदोलनामुळे जलसंपदा मंत्री धरणगावसह भुसावळच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही, हे आयोजकांनी वारंवार सांगितले मात्र खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील विस्तव जात नाही हे राज्याला ठावूक आहे तर मुख्यमंत्री भुसावळात आले असताना जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार चंदूलाल पटेल वा महाजन समर्थकदेखील आले नसल्याने भाजपातील गटबाजी पुन्हा अधोरेखीत झाली.

रक्षा खडसेंना मोठा दिलासा
माजी मंत्री खडसेंबद्दल समर्थकांच्या निराशा झाल्या असल्यातरी मुख्यमंत्र्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत तोंडभरून केलेले कौतुक मात्र त्यांची उमेदवारी ही रावेर लोकसभेसाठी निश्‍चित झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

बॅकड्रापवर उद्धव ठाकरेंचा फोटोच नाही
2014 च्या निवडणुकीत माजी मंत्री खडसेंनी युती तोडण्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला होता तर 2019 च्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा झाली मात्र या बैठकीला माजी मंत्री खडसे नव्हते त्यामुळे हा राग बॅकड्रॉपवरील फोटो हटवून तर व्यक्त झाला नाही ना ? अशी शंका उपस्थित करण्यास वाव आहे तर आयोजकांनी मात्र युती होण्याआधी हे सभेच्या व्यासपीठावर बॅनर्स (बॅकड्रॉप) तयार केल्याचे सांगितले.

खडसेंची मागणी ; मुख्यमंत्र्यांकडून दखल
खान्देशातील बागायती जिवंत ठेवायची असेलतर मेगारीचार्ज प्रकल्पाला चालना देण्याशिवाय पर्याय नाही तसेच खान्देशात मंजूर झालेल्या कृषीविद्यापीठाचा प्रश्‍न असो की हार्टीकल्चर, टिशूकल्चर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न असो तो मार्गी लागायला हवा, अशी अपेक्षा खडसेंनी भाषणातून व्यक्त करताच मुख्यमंत्र्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करण्यासह मेगा रीजार्जला चालना देण्याचे, वरणगाातील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या कामाला लवकरच सुरूवात करण्याचे दिलेले आश्‍वासन हा जिल्हावासीयांना दिलासा ठरला. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी फेकरी टोल नाका बंद करण्याचे दिलेले आश्‍वासनही वाहनधारकांसाठी या दौर्‍यात लाभदायी ठरले.