मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही महामंडळे बरखास्त करण्याचे धाडसी पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. गेली अनेक वर्षे ही महामंडळे म्हणजे भ्रष्टाचाराची कुरणे बनली होती. राज्य सरकारची 60 महामंडळे आणि समित्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या महामंडळावर राजकीय नियुक्त्यांची वाईट प्रथा सुरू केली. आपल्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी या महामंडळाचा वापर झाला. अनेकदा लिलावात ही पदे विकली गेल्याची चर्चा रंगत असे. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे काय झाले हे सर्वांसमोर आहे. या महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम तुरुंगात आहेत. त्यांच्या अगाध लीला चक्रावून टाकणार्या आहेत. ही महामंडळे म्हणजे अमाप संपत्ती कमावण्याचे साधन बनून गेले.
2000 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाची ही भ्रष्ट नेत्यांनी अशीच वाट लावली. मर्जीतील 12 सहकारी साखर कारखाने आणि एका सूतगिरणीला 94 कोटींची खिरापत वाटली आणि वसुलीच केली नाही. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच हे महामंडळ विसर्जित केले.विविध मंत्री आणि आयुक्त दर्जाचे 17 अधिकारी या महामंडळाचा कारभार पाहत होते. आता केवळ तीन प्रशासकीय अधिकारी याचा कारभार पाहत आहेत.सेना भाजपच्या 95-99च्या काळात कृष्णा खोरे महामंडळ स्थापन केले गेले. हे महामंडळ स्थापन करण्याचा हेतू मुळात पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके सुजलाम्-सुफलाम् व्हावे हा होता. पण माण, खटाव, सांगोला, जत, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर हे दुष्काळी तालुके पाण्यापासून वंचितच राहिले. मात्र, बारामती सुजलाम्-सुफलाम् झाले. त्यामुळे हे महामंडळ बरखास्त करून दुष्काळी तालुक्यांसाठी वेगळे प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यातील सुरक्षा महामंडळातील जवान हे महामंडळ गृहखात्यातर्फे चालवण्याची मागणी करत आहेत.हे महामंडळ म्हणजे भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता मागे न हटता केलेली घोषणा पूर्णत्वास नेली पाहिजे. आपण फक्त घोषणा करणारे मुख्यमंत्री नाही तर अंमलबजावणी करणारे मुख्यमंत्री आहोत, हे जनतेला दाखवून दिले पाहिजे.
कमला मिलची घटना ही सुरुवात आहे!
कमला मिलच्या दुर्घटनेनंतर दोन चार पालिका अधिकार्यांना निलंबित करून हे प्रकरण संपणार नाही. यासाठी राज्य सरकारला मुंबईतील सर्वच मॉलबाबत एक निश्चित धोरण ठरवावे लागेल. फक्त मॉल आणि पब्ज याला कारणीभूत आहेत असे नाही तर नवश्रीमंत मुंबईतील शोक यास कारणीभूत ठरत आहेत. सर्व मुंबईत सध्या हुक्का पार्लरचे पेव फुटले आहे. कमीत कमी जागेत सुरू असलेली ही हुक्का पार्लर आगीला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरत आहेत.वांद्रे, अंधेरी, मालाड, बोरिवली या भागांत ठिकठिकाणी हुक्का पार्लर राजरोसपणे सुरू आहेत. यावर सरकारने प्रथम बंदी आणावी. त्याचबरोबर मिळालेल्या एफएसआयचा सोयीस्कर अर्थ लावून हवे तसे होणारे बदल यातूनच या घटना घडत आहेत. अशा जागांना परवानगी देताना पालिकेचे अधिकारी नावाला नोटीस देतात. एखादी मोठी दुर्घटना घडली की निलंबित होतात आणि पुढे कोर्टात सहीसलामत सुटतात.
फक्त अंधेरी लोखंडवाला परिसरात शेकड्यांनी पब्ज आहेत. या जोडीला हुक्का पार्लर ही आहेत. ही हुक्का पार्लर सरसकट बंद केली तरच पुढील दुर्घटना टळतील.परवा कमला मिलमधील या दोनही रेस्टॉरंट बारमध्ये हुक्का पार्लर होते. हुक्क्यात कोळसा टाकल्यानंतर आग भडकली, हे आता लपून राहिलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः यात लक्ष घालून हुक्का पार्लरवर सरसकट बंदी आणावी.
– नितीन सावंत
सहसंपादक, जनशक्ति
9892514124