देहूरोड । रेडझोनच्या आंदोलनकर्त्यांची दखल घेऊन संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बुधवारी मुंबईत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच आमदार बाळा भेगडे यांच्या विनंतीमुळे गुरुवारी सायंकाळी चौथ्या दिवशी आंदोलन स्थगित करण्यात आले. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनीही आंदोलकांची भेट घेऊन सोबत लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.
येथील दारूगोळा कोठारामुळे लागू करण्यात आलेल्या रेडझोनची हद्द कमी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी रेडझोन संघटनेच्यावतीने सोमवारपासून कॅन्टोमेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू होते. बुधवारी मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. रेडझोनमुळे खचलेल्या शेतकर्यांनी आत्महत्येची भाषा सुरू केली असून प्रकरण खूप गंभीर वळणावर असल्याचे यावेळी आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. संरक्षणमंत्र्यांसोबत रेडझोन संस्थेच्या शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी दिली. आमदार भेगडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती.