शिंदखेडा । मुख्यमंत्र्याच्या दौर्या दरम्यान विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शासनाविरोधात घोषणाबाजी करुन काळे कापड दाखवून निषेध व्यक्त करणार्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदखेडा येथे जिल्हा आढावा बैठकीसाठी ताफ्यासह जात असतांना कचेरी चौकाजवळ रोडच्या कडेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राकेश खुमनसिंग राजपूतसह कार्यकर्त्यांनी हातात काळे कापड दाखवून शासन विरोधात घोषणा दिल्या. शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेण्यात यावा, अशा मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केले. संबंधितांनी जबाव बंदी आदेश झुगारुन प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक देविदास भोज यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन राकेश राजपूतसह चेतन गुलाबराव पाटील, नितेश पाटील, राजू देसले, मनोज कुवर, विलास माळी, वैभव देसले, कुलदीप निकम, राष्ट्रभूषण पाटील, प्रवीण पाटील, विलास गोसावी, मूकेश चव्हाण, भैय्या माळी या 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.