धुळे । मुख्यमंत्र्यांच्या धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर उद्या 17 मे रोजी येणार आहेत. या दौर्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच यावेळी त्यांची सभा देखील होणार आहे. पांझरा नदी पात्रात त्यांची सभा होणार आहे. या सभेसाठी नदी पात्रातील जागा समतल करुन नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच सभेसाठी व्यासपीठ तयार केले जाणार असून त्याची तयारी पुर्णत्वाकडे आली आहे. मात्र त्यांच्या सभेवरून आणि एकूणच दौर्यावरून धुळ्यात चांगलेच राजकारण तापले आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर शिवरायांचा अवमान करणार्यांपैकी कोणीही आढळल्यास ही सभा उधळणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी पत्रपरिषदेत दिला आहे तर मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न झाला तर तुडवून काढू, असा सज्जड इशारा आ.अनिल गोटे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पांझरेत तयारी
पांझरा नदी पात्रात मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. या सभेसाठी नदी पात्रातील जागा समतल करुन नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच सभेसाठी व्यासपीठ तयार केले जाणार असून त्याची तयारी पुर्णत्वाकडे आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक भवन, रस्त्याच्याकडेला बसून व्यवसाय करणार्या पथारी व्यावसायीकाने पुर्नवसन करण्यासाठी मनपाने बांधलेल्या ओट्यांचे लोकार्पण, पारोळारोडवरील नव्याने बांधलेल्या पोलीस चौकीसह पांझरा नदीवरील पाईप मोरी, रस्त्याचे लोकार्पण, 75 कोटी 16 लाख रुपये खर्चून राबविण्यात येणार्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ, धुळे बाजार समिती ते शासकीय तंत्र निकेतन पर्यंतचा 2 किमीचा रस्ता, पांझरानदीवर पुर्ण उंचीचा पूल बांधून वर्षभर 12 फूट उंचीच्या पाणी साठवणुकीकरीता बंधारा, जूने धुळे ते अमरधामला जोडणार्या पाईपमोरीचे काम, ख्वाजाजी धंडो ते देवपूर महमदीनगर जोडणारी पाईप मोरी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेलरोडवरील विस्थापित अतिक्रमणाच्या पुर्नवसनासाठी लक्ष्मीबाई देव होस्टेलच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचे भूमिपूजन या कामांचा समावेश आहे.मुख्यमंत्री पांझरानदी पात्रातील सभास्थळावरुन या सर्व कामांचे हायटेक ओपनिंग म्हणजेच रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने होणार आहे. या सर्व कामावर आ.गोटे लक्ष ठेवित असून जिल्हा पोलीस अधिक्षक एम.रामकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिवाणसिंग वसावे, आझादनगरचे निरिक्षक रमेशसिंह परदेशी यांनी पहाणी करुन आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांची सभा उधळणारच! : मोरे
एकीकडे लाखो-करोडो रुपये खर्चुन अरबी समुद्रामध्ये जगातील एकमेव सर्वात उंच शिवस्मारक उभारणारे मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती शिवरायांचा अवमान सहन करतात कसे? जर आ.अनिल गोटे यांच्याकडे शिवरायांची प्रतिमा पायदळी तुडविणार्यांबद्दल सबळ पुरावे आहेत तर त्यांनी त्यांचा पक्षप्रवेश सहन केला कसा? तसेच आ.गोटे हे सर्वच कामे बेकायदेशीरपणे करतात आणि या बेकायदेशीर कामांच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहावे का, असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांच्या व्यासपिठावर शिवरायांचा अवमान करणार्यांपैकी कोणीही आढळल्यास ही सभा उधळणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी पत्रपरिषदेत दिला. यावेळी माजी महापौर मोहन नवले, धुळे महापालिका सभापती कैलास चौधरी, नवाब बेग, मनोज वाल्हे, राजकुमार बोरसे, संजय वाल्हे, रजनीश निंबाळकर, वाल्मिक जाधव, साहेबराव देसाई, पंडीत सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या दौर्याचे आ.गोटे यांनी बेकायदेशीरपणे आयोजन केले असून कोणत्याही विभागाची त्यांनी परवानगी न घेता नदीपात्रात सभा घेतली असल्याचे मनोज मोरे यांनी सांगितले. पुण्यात पाच जणांनी भाजपात पक्षप्रवेश केला त्यापैकी काहींनी शिवरायांच्या प्रतिमेला पायदळी तुडविले असल्याचे पुरावे आ.गोटे यांच्याकडे होते तरीही त्यांना पक्षात घेतले. शिवरायांचा अवमान हा आमच्या अस्मितेचा प्रश्न असून अशांचे नाव जाहीर करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी मनोज मोरे यांनी यावेळी केली.
…सहनशीलतेचा अंत पाहू नका : – आ. गोटे
आ.गोटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, धुळे शहराचा कायापालट करण्याच्या सुरवातीस जेवढा अपशकून करता येईल तेवढे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहेत. राजे संभाजी यांच्या जयंती निमित्ताने एकत्रीत आलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांसमोर मनोज मोरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेवर दगडफेक करण्याची चिथावणी दिली आहे. आश्चर्य असे की, जे स्वत:ला शाहू महाराजाचे वंशज म्हणून मिरवितात ते माजी आमदार व शहराचे गुंडाचे आश्रयदाते राजवर्धन कदमबांडे हेही उपस्थित होते. माता रमाबाई आंबेडकर नगरातील महिलांना बोलावून आपण सर्व मिळून चौपाटी कडून दगड फेक करून सभा उधळून लावू अशा चिथावण्या देत होते. आजपर्यंत त्यांच्या पंचवीस वर्षात धुळे शहर 100 वर्ष मागे नेवून ठेवले आहे. विकास नव्हे तर, जागोजागी अतिक्रमण व गुंडगिरी करून तरूणांना सट्टा जुगार, हातभट्टी, डांबर, रॉकेल इत्यादी व्यवसायास लावून त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी केली. विकासाच्या कामाला मात्र विरोध शहरातील तरूण वर्ग अजिबात सहन करणार नाही. तरूणाच्या सळसळत्या रक्तास मी रोकून ठेवले आहे. ज्या दिवशी सहनशिलतेचा अंत होईल त्या दिवशी हीच तरूण मंडळी घरातून बाहेर काढून तुडवतील तो क्षण दूर नाही जवळ येत आहे, असे आ.गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.