मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भुसावळ शहर सजले

0

डी.एस.ग्राऊंडवर मंडपाची उभारणी ; तीन हजार झेंड्यांसह पताकांनी सजले शहर ; शहरात स्वागताच्या 12 मोठ्या कमानी ; व्यासपीठावर 45 मान्यवरांच्या बसण्याची व्यवस्था ; कार्यक्रमस्थळी सहा भव्य एलईडी स्क्रीन ; अनेक मार्ग बंद होणार

भुसावळ- शहरात विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी जोरदार तयारी चालवली आहे. गुरुवार, 21 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरातील डी.एस.ग्राऊंडवर आयोजित कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यासह खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यवृत्तांताचे प्रकाशन, सावद्यासह निंभोरा व बोदवड येथील रेल्वे ब्रीजचे ऑनलाईन उद्घाटन, नगरपालिका उद्यान लोकार्पण, प्रशासकीय ईमारतीचे व आमदार निधीतील उद्यानाचे रीमोटद्वारे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचा दौरा प्राप्त होण्याची शक्यता असून गुरुवारी सकाळी 11 वाजता धरणगाव येथील कार्यक्रमास तर दुपारी एक वाजता भुसावळ येथील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमास ते येण्याची दाट शक्यता आहे.

भुसावळात होणार जंगी स्वागत
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी तयारी चालवली आहे. डी.एस.ग्राऊंडवरील नियोजित सभा स्थळावर 30 बाय 50 आकाराचे स्टेज उभारले जात असून त्यावर केवळ 45 मान्यवरांना बसता येणार आहे तसेच 300 बाय 220 आकाराचा डोम व 300 बाय 300 आकाराचे सिलिंग तर 12 हजार लोक खुर्चीवर बसतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे म्हणाले. कार्यक्रमस्थळी सहा भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात येणार असून पिण्याच्या पाण्यासाठी थंडगार जारची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात तीन हजार झेंडे व पताका लावण्यात आल्या असून मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील डिव्हायडरला पालिकेतर्फे रंगरंगोटी केली जात आहे. बैठकीच्या यशस्वीतेसाठी 200 कार्यकर्त्यांची टीम अहोरात्र झटत असून माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सरचिटणीस प्रा.सुनील नेवे आदी दररोज याबाबत आढावा घेत आहेत.

ग्रामीण रुग्णालयामागे हेलिपॅड
नवोदय विद्यालयाच्या पाठीमागे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली असून तेथून मुख्यमंत्री सरळ सभास्थळी येणार आहे. यावेळी महामार्ग तसेच जळगाव रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे तर सभेनंतर मुख्यमंत्री आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार असून वाल्मीक मेहतर समाजाच्या जामनेर रोडवरील मेळाव्यास उपस्थिती देणार आहेत. या दरम्यानही वाहतूक शाखेतर्फे बॅरीकेटींग तसेच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येवून रस्ता तात्पुरता बंद करण्यात येईल तसेच मुख्यमंत्र्यांची सभा संपेपर्यंत आरपीडी रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

700 वर पोलिसांचा बंदोबस्त राहणार
मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जिल्हास्तरावर सुमारे 700 पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी येतील, असे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा अद्याप प्राप्त झाला नसलातरी सभास्थळासह हेलिपॅडची पोलिस प्रशासनाने पाहणी केली आहे तसेच मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेबाबत तसेच बंदोबस्ताबाबत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासोबत बैठकही घेण्यात आली.