मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाजॉब्स पोर्टलचे उद्घाटन; रोजगारनिर्मितीसाठी मिळणार मदत

0

मुंबई: उद्योजक आणि अकुशल, अर्ध-कुशल, कुशल मनुष्यबळ यामधील दरी कमी करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. हे ऑनलाईन पोर्टल आहे. महाजॉब्स हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा रोजगार शोधणार्‍यांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे. महाजॉब्स उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करते.

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा महाजॉब्सचा सातत्याने प्रयत्न आहे.

कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टीकोनातून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन करणे हे महाजॉब्सचे लक्ष्य आहे. उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे, महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे हे उद्देश आहे.

महाराष्ट्र, महाजॉब्स, आपले सरकार सुद्धा महाविकास आघाडीचे आहे. त्यामुळे ‘महा’ फॅक्टर आहे, जे करू ते भव्यदिव्य करू, त्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. त्या पावलाबद्दल मी सर्वाना धन्यवाद देतो आणि हे पाऊल यशस्वी होवो यासाठी शुभेच्छा देतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.