मुख्यमंत्र्यांनी अजितदादांकडे ट्युशन लावावी : खा. सुळे

0

पुणे । तीन-तीन वर्षे अभ्यास करुनही जर राज्यातील प्रश्‍न सुटत नसतील तर सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्युशन लावण्याची गरज आहे. आणि ट्युशन अजित पवार यांच्याइतकी चांगली कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे ट्युशन लावावी, असा खोचक सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. इंदापुर तालुक्यातील गलांडवाडी गावाच्या दौर्‍यावर असताना त्या बोलत होत्या.

खासदार सुळे म्हणाल्या, एखादा विद्यार्थी तीन-तीन वर्ष अभ्यास करून पास होत नसेल तर त्याला आपण ट्युशन लावतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सत्ता हाती घेऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. अजूनही ते अभ्यासच करत आहेत. खर्‍या अर्थाने त्यांना आता ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्याकडे ट्युशन लावावी, आम्ही त्यांच्याकडून फी सुध्दा घेणार नाही, अशी टिप्पणीही सुळे यांनी केली.