मुंबई | उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी सकाळी वर्षा या मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दात राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. ’’राजीनाम्याची आवश्यकता नाही. मी राजीनामा स्वीकारणार नाही. निष्पक्ष चौकशी होईल. चौकशीअंती येणार्या अहवालाचा निष्कर्ष योग्यवेळी पाहू,’’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे देसाई यांच्या कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि देसाईंचा राजीनामा स्वीकारणार नाही, अशी माहिती दिली. शुक्रवारी रात्री देसाई यांनी ठाकरे यांची भेट घेऊन झालेल्या एकूण प्रकरणाविषयी चर्चा केली. सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले की ’चौकशीच्या काळात मंत्रीपदावर आपण राहू नये असे वाटले म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडे राजीनामा देऊ केला; परंतु तो त्यांनी स्विकारला नाही. आता चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार व येणारे निष्कर्ष मान्य करणार.’