धुळे । मुख्यमंत्री शहरात आल्यावर त्यांना विविध पक्ष संघटनांव्दारे निवेदन देण्यात येणार होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ती निवेदन न स्विकारता धुळे जिल्ह्यांतील जनतेवर अन्याय केला असून लोकशाहीला काळीमा फाणारी घटना असल्याचे भिमशक्ती संघटनेतर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. मुख्यमंत्री धुळे येथे कॅन्सर हॉस्पीटलचे उद्घाटन समारंभासाठी आले होते. त्यांच्या समवेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.सुभाष भामरे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल व भाजपाचे विविध मतदार संघाचे आमदार व खासदार उपस्थित होते. तसेच दि.26 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महाराष्ट्र राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल हे आले असता या मंत्र्यांनी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेलेले असतांना कुणाचेही निवेदन मुख्यमंत्र्यांसह कुठल्याही मंत्र्यांनी स्विकारलेले
नाही.
निवडणूकीत जागा दाखविणार
लोकशाही दाबण्याचा प्रयत्न या भाजपामंत्र्यांनी केला आहे. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी याकडे लक्ष देत नाही, काही आवाजही उठवित नाही. येणार्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. तसेच धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे मंत्री धुळेकर जनतेचा विश्वासघात करीत असेल तर यांची मक्तेदारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही असे पत्रकात म्हटले आहे. भाजपा पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी तात्काळ धुळेकर जनतेची माफी मागावी अन्यथा भिमशक्ती संघटना भाजपाच्या मंत्र्यांना धुळे जिल्ह्यात फिरु देणार नाही.असा इशारा भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर यांनी दिला आहे.