खासदार सुप्रिया सुळे यांनी घरापासून राजकारणापर्यंत साधला मुक्त संवाद : एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे मुलाखत
पुणे : मुख्यमंत्रीपदी महिलाच असली पाहिजे, असा एक विचार प्रवाह आहे. पण मला तसे वाटत नाही. त्या पदावर पुरुष जरी असला, पण तो स्त्रियांच्या प्रश्नांच्या बाबतीत संवेदनशील असेल, तर तो ही चांगलेच काम करू शकतो. खरे म्हणजे स्त्रियांच्या उद्धारासाठी काम करणारे फुले-आंबेडकरांसारखे पुरुषच होते. शरद पवार यांनीही महिला आरक्षणा संदर्भात भरीव कार्य केले आहे. असे विचार बारामती मतदार संघाच्या व राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
एमआयटीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मयूर देशमुख याने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. डी.पी. आपटे उपस्थित होते. आम्हीसुद्धा सर्व सामान्य लोकांच्यासारखेच जगतो. भोजनाच्या टेबलावरच्या आमच्या गप्पा तुम्हा-आम्हा सारख्याच असतात. माझे वडील जरी खूप मोठे पुढारी असले, तरी त्यांनी आम्हाला पुरेसा वेळ दिला. आई आणि वडील या दोघांचेही आमच्यावर सारखेच संस्कार आहेत. आमचे एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे अजित दादा व मी एकत्रच वाढलो, असे सुळे यांनी सांगितले.
लोकसभेच्या अधिवेशानापूर्वी मी भरपूर अभ्यास करीत असते. एवढा अभ्यास जर मी आधी केला असता, तर खूपच उच्च दर्जाची पदवी मिळविली असती. लोकसभेमध्ये खासदारांनी शिस्त पाळली पाहिजे. सभापतींच्या पुढील मोकळ्या जागेत मी कधीही जात नाही. फारतर मी जागेवर उभी राहते. मी जेव्हा बोलते, तेव्हा एक खासदार म्हणून बोलते. त्या जबाबदारीची जाणीव मी सदैव ठेवलेली असते. बाळासाहेब ठाकरे यांनीच माझ्या लग्नाचे सगळे नियोजन केले आहे. पक्षाच्या भिंती ओलांडून आपल्यामध्ये संवाद असावा असे मला वाटते. हेच खरे लोकशाहीचे लक्षण आहे.