मुख्याधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळे नगराध्यक्षांचा उपोषणाचा इशारा!

0

माथेरान । विकसनशील पर्यटनक्षेत्र बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मुख्याधिकारी सागर घोलप यांच्याकडून मिळत नसल्याने अखेरीस त्यांच्या मनमानी कारभारबाबतीत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी घेतला आहे. माथेरानमधील स्थानिक लोकप्रतिनिधींना विकासकामासाठी सोबत घेऊन जाण्याऐवजी एकला चलोची एकतारी भूमिका घेऊन गावाला विकासाकडे नेण्याऐवजी अधोगतीला नेत असल्याने केवळ मुख्याधिकारी सागर घोलप यांच्यामुळेच मागील वीस महिन्यांपासून अनेक महत्त्वपूर्ण कामे प्रलंबित राहिली आहेत. जनतेने त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्हाला नगरपालिकेत निवडून दिलेले आहे. मुख्याधिकारी कामात दिरंगाई अन चालढकल करत असल्याने याचा जाब आम्हाला जनतेला द्यावा लागत आहे.

ठेकेदारांची जुनी बिले अदा केली जात नाहीत
असे नगराध्यक्ष यांचे म्हणणे आहे. मुख्याधिकारी हे नागरिकांच्या सुखसोयीसाठी कोणतीही निविदा काढत नाहीत. माथेरान हे सन 2003 मध्ये पर्यावरण दृष्टीने संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यामुळे प्रत्येक विकासाची जबाबदारी ते संनियंत्रण समितीवर ढकलत आहेत आणि आपली बाजू सुरक्षित करत आहेत. शासनाच्या वेतनाशिवाय अन्य कोणत्याही कामात त्यांना स्वारस्य दिसत नाही. ठेकेदारांची जुनी बिले अदा केली जात नाहीत. त्यामुळे निविदेतील नवीन कामे घेण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. दुपारी दोन नंतर कार्यालयात हजेरी लावून कामगारांना रात्री उशिरापर्यंत राबवून घेतले जात असल्याने याबाबत विचारणा केल्यास लोकप्रतिनिधीशी तसेच कामगार यांच्याशी असभ्य वर्तन केले जात आहे.

प्रेरणा सावंत यांनी उपोषण करण्याचा पवित्रा
पावसाळ्यात आपत्कालीन वेळी उपस्थित राहत नाहीत. नेहमीच गैरहजर असून हप्त्यातून दोन ते तीन दिवस कार्यालयात दुपारनंतर येऊन कामगारांना वेठीस धरले जाते. सफाई कामगारांना वेळेत पगार देत नाहीत. त्यामुळेच विविध ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यांच्या पाठीवर एखादया वरिष्ठांचा हात असल्याप्रमाणे ते वावरत आहेत. त्यामुळे अशा निष्क्रिय मुख्याधिकारी यांना सक्तीची रजा देण्यात यावी अन्यथा मी आठ दिवसांत नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे, असा पवित्रा खुद्द नगराध्यक्ष प्रेरणा प्रसाद सावंत यांनी घेतला. त्याबाबतचे निवेदनपत्र 1 मार्च रोजी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिलेले आहे. खुद्द नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी उपोषण करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत याबाबत चर्चा सुरू आहे.