मुख्याध्यापिकेला जीवे मारण्याची धमकी

0

होळनांथे । येथील सेंट मदर टेरेसा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शैक्षणिक शुल्क माफी मागणीच्या वादातून गुन्हा दाखल करण्यात आला असून येथील मुख्याध्यापिकेला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.

होळनांथे येथील जसुआई बहुउद्देशीय संस्था संचलित सेंट मदर टेरेसा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या भावाचा नातू शिकत आहे. त्यास शाळेतून घरी नेण्यासाठी आलेल्या मुकेश पंढरीनाथ भोई यास शाळेची बाकी असलेल्या फी संदर्भात विचारणा केली असता त्याचा राग येऊन मुकेश याने मोठ्या आवाजात प्राचार्य जी.बी.जोसेफ यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली. त्यानंतर शाळेच्या गेटवर जावून मोबाईलमध्ये शाळेचे चित्रीकरण करू लागला तसे केल्यास विरोध केल्याने मुकेश याने वडील पंढरीनाथ भोई व अशोक विठ्ठल भोई यांना बोलवून घेतले.

गुन्हा दाखल
ते शाळेत आल्यावर त्यांनी महिला मुख्याध्यापिकेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तुला घरातून उचलून घेऊन जाईल अशी धमकी दिली. याबाबत प्राचार्य जी.बी.जोसेफ यांनी थाळनेर पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून पंढरीनाथ संतप भोई, मुकेश पंढरीनाथ भोई, अशोक विठ्ठल भोई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.