मुख्यालय राहण्याच्या आदेशाला ‘मनवेल’ मध्ये अधिकारी, कर्मचार्‍यांचा ‘खो’

0

यावल- शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी मुख्यालयीच निवास करावा, असे सर्वत्र शासन आदेश असलेतरी तालुक्यातील मनवेल येथे मात्र या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. एकही अधिकारी वा कर्मचारी मुख्यालयी न पाहता अप-डाऊन करीत असल्याने नागरीकांना सोयी-सुविधा पुरवताना पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात विविध विभागातील कर्मचारी काम करतात त्यात पशूवैद्यकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, वायरमन, आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसह अनेक कर्मचार्‍यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील नागरीकांना सुविधा त्वरीत मिळाव्या व त्यांचे काम तत्काळ पूर्णत्वास यावे म्हणून कर्मचार्‍यांनी मुख्यालयी रहावे, असे आदेश शासनाने पारीत केले असलेतरी ग्रामीण भागात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी या आदेशाला हरताळ फासल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

दोन तासात काम आटोपून कर्मचारी माघारी
शासकीय कर्मचारी सकाळी 10 वाजता येतात व दुपारी 12 वाजता तालुक्याच्या ठिकाणी मिटींग असल्याचे सांगून गायब होतात शिवाय भ्रमणध्वनीदेखील बंद केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मनवेल परीसरातील कृषी सहाय्यकांकडे पाच गावांचा पदभार असून आठवड्यातील प्रत्येक गावात एक दिवस नेमलेला आहे मात्र महिनाभरात एक-दोन दिवस पूर्ण गावांना भेटी देऊन ते पूर्ण महिनाभर दांडी मारत असल्याची शेतकर्‍यांची ओरड आहे. तसेच मनवेल येथे साकळी येथील पशूवैद्यकीय अधिकारी गेल्या कित्येक दिवसांपासून फिरकले नसल्याची तक्रार असून त्यांचे साकळी मुख्यालय आहे. या शिवाय अन्य विभागातील अनेक कर्मचारी तालुक्यातील तर काही कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणाहून अप-डाऊन करतात. वरीष्ठ अधिकार्‍यांनी या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी मनवेलकरांनी केली आहे.