मुदत संपलेल्या गाळ्यांचा दौरा

0

जळगाव । महानगर पालिकेच्या मुदत संपलेल्या 18 मार्केटमधील 2175 गाळे दोन महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने 14 जुलै रोजी दिले आहेत. ही प्रक्रीया 15 दिवसांत सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश खंडपीठाने दिले आहेत. यानुसार जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवार 18 जुलै रोजी सर्व 18 मार्केटची पहाणी केली. श्री. निंबाळकर यांनी सेंट्रल फुले मार्केटपासून या पहाणीस सुरूवात केली. आयुक्त श्री. निंबाळकर सेंट्रल फुले मार्केटमध्ये दाखल झाल्यावर अतिक्रमणधारकांची धावपळ उडाली. काही अतिक्रमणधारक हातगाडीधारकांनी आपली गाडी घेवून पळ काढला. ज्या दुकानदारांनी पाल बांधलेले होते ते काढण्यासाठी सरासावले. अतिक्रमणधारकांची धावपळ बघून आयुक्त श्री.निबांळकर यांनी त्यांना थांबवण्या सूचना केल्या. श्री. निंबाळकर यांनी यानंतर धर्मशाळा मार्केटची पहाणी केली. यानंतर त्यांनी जुने बी. जे. मार्केटला भेट देवून पहाणी केली. तसेच डॉ. आंबेडकर मार्केट भेट देवून ते नानीबाई अग्रवाल मार्केटसह इतर सर्व मार्केटला त्यांनी भेट दिली. आयुक्त पहाणी करीत असतांना मार्केटमधील व्यावसायिक व नागरिक उत्सुकतेने पहात होते.

रेडीरेकनरनुसार लिलाव
मार्केटमध्ये आयुक्त पहाणी करत असतांना दुकानदारांमध्ये ते का आलेत याची चर्चा होती. तर काहींनी मार्केटमधील स्वच्छता पहाण्यासाठी आले असल्याचा तर्क लढवून समाधान मानून घेतले. मुदत संपलेल्या गाळ्यांचा लिलाव करण्यात येणार असून यातून मनपाला 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. रेडीरेकनर दराचा आधार घेऊन गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. या गाळेधारकांकडे 4 वर्षाची भाड्याची थकबाकी व त्यावरील पाचपट दंडाची वसुली देखिल करण्यात येणार आहे

मुदत संपलेले गाळे

या मुदत संपलेल्या गाळेधारकांची संख्या मार्केटप्रमाणमा. फुले मार्केट 259 गाळे, सेंट्रल फुले मार्केट 651, रामलाल चौबे मार्केट 40, भोईटे मार्केट 24, जुने बी. जे. मार्केट 272, डॉ. बाबसाहेब आंबडकर मार्केट 64, वालेचा मार्केट 12, छत्रपती शाहु मार्केट 175, शास्त्रिी टावर खालील दुकोन 4, शिवाजी नगर दवाखान्या जवळील दुकाने 2, मा. गांधी मार्केट 137, भास्कर मार्केट 281, रेल्वे स्टेशन चौक 18, कै. निर्मलाबाई लाठी हॉल, नानीबाई अग्रवाल मार्केट 30, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान लगत मार्केट 7, जुने शाहू मार्केट 112, धर्मशाळा मार्केट 06 गाळ्यांचा समावेश आहे.

650 गाळ्यांची सूनावणी पूर्ण
यापूर्वी महानगर पालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात नोटीस देऊन सुनावणी घेतली आहे. अशा सुनावणी पूर्ण झालेले 650 गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रीया राबविण्याबाबत चाचपणी महानगर पालिकीतर्फे करण्यात येत आहे. महानगर पालिकेच्या 18 मार्केटमधील 2175 गाळ्यांची भाडेकराराची मुदत संपल्याने महानगर पालिकेने या गाळेधारकांना 81 (ब) नुसार नोटीसा दिल्या होत्या. यानुसार प्रशासनाकडून चाचपणी केली जात आहे.