मुरबाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

0

मुरबाड । मुरबाड तालुक्यात शहरी व ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक व जिल्हा परिषद स्कूल तसेच शासकीय व अशासकीय कार्यालयांमध्ये भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने मुरबाड विधानसभेचे आमदार किसान कथोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. तसेच आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते समता सामाजिक फाउंडेशन च्या वतीने मोफत दैनिक वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. तर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रिपब्लिकन पार्टी (आ), बहुजन समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एस), भारिप, बहुजन विद्यार्थी परिषद भारतीय काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी पार्टी, मनसे, शिवजयंती उत्सव समिती मुरबाड, मुस्लिम समाज मुरबाड शहर, कुणबी समाजोन्नती मंडळ, कोतवाल प्रतिष्ठान मुरबाड, सामाजिक संघर्ष समिती मुरबाड, श्रमजीवी संघटना मुरबाड इत्यादी संघटनांनी सहभाग घेऊन भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

तसेच तरुण भीमसैनिकांनी मुरबाड-धसई-टोकावडे-म्हसा परिसरात बाईक रॅली काढून जयंती साजरी केली. सतत चार दिवस विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. त्यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, मुरबाड ग्रामीण रुग्णालयात महात्मा फुले जयंतीनिमित्त रुग्णांना फळे वाटप, कुणबी समाज हॉल मध्ये प्रथमच भारतातील पहिले आजी आजोबा संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, टिळक चौक मुरबाड येथे होम मिनिस्टर कार्यक्रम, 14 एप्रिल रोजी मुरबाड शहरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृहात वसंतराव कोळंबे यांचे व्याख्यान झाले. तसेच मुरबाड नगरपंचायत समोर पंचशीला मुंबई यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ युवक मित्र मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष भाऊसाहेब देसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.