मुरबाड । मानवली येथील व्यापार्याच्या हत्येप्रकरणी मुरबाड पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये स्वप्निल धर्मा वरकुटे (19 राहणार उशीद, ता-कल्याण), विजय बजरंग वाघ (25 राहणार भुवन, ता-मुरबाड), किरण जयराम मलिक (19 राहणार-वाचकोले, ता-शहापूर), किरण गोविंद हरड (19 राहणार-खारीवली, ता-शहापूर) यांचा समावेश आहे. या चारही आरोपींनी गुन्हा कबुली केल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
तालुक्यातील व्यापारी मानवली येथे राहणारे मधुकर दाजी उमवणे (42) उर्फ बबलू हा आपल्या स्वतःच्या सुमो गाडीने मुरबाड ते बदलापूर असे भाडे घेऊन 8 नोव्हेंबरला गेला होता. परंतु, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने गावातील मंडळी त्याचा सर्वत्र शोध घेत होती. परंतु, 11 नोव्हेंबरला बदलापूर बारवी डॅम रोडवर असलेल्या बेलपाडा गावाच्या हद्दीतील जंगलात पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला होता.
सीसीटीव्हीद्वारे मिळाली तपासाला गती
याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात मयत मधुकर यांचे भाऊ रमेश दाजी उमवणे यांनी फिर्याद दाखल केली होती. मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे आपल्या तीन पथकांसह अधिक तपास करत होते. गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गाडी सरळगाव येथून जात असताना खासगी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला गती मिळाली. त्याआधारे आरोपींपर्यंत पोहचण्यात यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखा व मुरबाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी या सर्वानी विशेष मेहनत घेऊन तत्काळ वेगवेगळी माहिती गोळा करून आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे करत आहेत. पत्रकारांशी बोलताना राजेंद्र मोरे यांनी सांगितले की सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावेत. जेणेकरून कोणत्याही गुन्ह्याचा शोध घेताना पोलिसांना सहकार्य होईल.