नांदगाव । मुरुड तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष हा नशीबवान ठरला आहे. मागील टर्ममध्येसुद्धा सदस्य संख्या कमी असताना सभापतिपद मिळाले होते, तर यावेळी मुरुड तालुक्याचे शिवसेना तालुका अध्यक्ष निलेश घाटवळ व मुरुड पंचायत समितीच्या विद्यमान सभापती नीता घाटवळ यांनी बारशीव येथील झालेल्या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षात आपल्या चारशे कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने शेतकरी कामगार पक्षाची ताकदीत वाढ झाली आहे. मुरुड पंचायत समितीवर ऐकून चार सदस्य आहेत. त्यापैकी शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी व काँग्रेस आय पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. शिवसेनेचे दोन सदस्यांपैकी नीता घाटवळ या सभापती होत्या. त्यांनी प्रवेश केल्याने सभापतीपद आता शेतकरी कामगार पक्षाकडे राहणार आहे. घाटवळ यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. या दोघांचा पक्ष प्रवेश शेकापचे नेते व आमदार जयंतभाई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार धर्यशील पाटील, आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार मीनाक्षीताई पाटील, पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत, माजी सभापती रमेश नागवेकर, राम बंदरी, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, सी.एम. ठाकूर, माजी बांधकाम सभापती चित्रा पाटील आदीसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाराज शेकापमध्ये प्रवेश करणार
यावेळी उपस्थित लोकांसमोर भाषण करताना आमदार जयंत पाटील म्हणाले की, मुरुड तालुका सेना प्रमुख सारखा व्यक्ती जर जाहीरपणे शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करीत असेल तर अवजड मंत्री गीते यांना ही चपराक आहे. या रायगड जिल्ह्यात गीते यांना विकास करता आलेला नाही. सहा वेळा खासदारकी भूषवलेल्या गीते यांनी किती लोकांना रोजगार दिला किंवा आपण ज्या खात्याचे मंत्री आहेत किती औद्योगिक कारखाने आणलेत याची जनतेला माहिती द्यावी. कोणताही विकास कामना निधी देत नसल्यानेच कार्यकर्त्यांची घुसमट चाललेली आहे. त्याचे उदारहण म्हणजे निलेश घाटवळ हे आहेत.शिवसेनेत अजून खूप नाराज मंडळी शेकाप मध्ये प्रवेश करणार असून आता मला मुरुडमध्ये वारंवार पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी यावे लागणार आहे, असे संकेतसुद्धा यावेळी आमदार जयंत पाटील यांनी दिले. सदरच्या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. या मुरुड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या सुरुवातीची मते तीन हजार होती. परंतु, सध्या आम्ही मुरुड तालुक्यात एक नंबरवर असून आमदारकीला सुद्धा मुरुड तालुक्यातून सर्वाधिक मते मिळवण्याचा आमचा उद्देश आहे. शेकापसोबत लढण्याची हिंमत गीते यांनी करू नये मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणायचा गीते यांचा प्रयत्न होता. परंतु, या जिल्ह्यात आमचे जिल्हा परिषद सदस्य जास्त निवडून आले आहेत.