जळगाव : जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून पट्ट्याणे अमानुष मारहाण करण्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. सुरुवातीला या प्रकरणी अटकेसाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी आता दोघांना अटक केली आहे. जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावातल्या मालकाच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेल्याने ही अमानुष मारहाण केल्याचं पुढं आलंय. मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मारहाण करणाऱ्या प्रल्हाद कैलास लोहार आणि ईश्वर बळवंत जोशी या दोघांना अटक करण्यात आले आहे. दोघांवर अॅट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी पीडितांवर प्रश्नांचा भडिमार करून पट्ट्याणे जबर मारहाण करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे ही दोघे मुले कामाला होती. या घटनेनंतर लहूजी साळवे संघर्ष सामितीतर्फे पोलिसांत तक्रार देण्यात आली. मात्र सुरूवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळटाळ करण्यात आल्याचा आरोप होतो आहे. मात्र माध्यमांमधून टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर पोलिसांची पळापळ सुरू झाली.