मुलाखत ‘हीट’; ‘इम्पॅक्ट’ सुरु!

0

पुणे (विशेष प्रतिनिधी) – पुणे येथील बीएमसी महाविद्यालयाच्या प्रांगणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेली ऐतिहासिक मुलाखत आता परिणाम दाखवू लागली आहे. या मुलाखतीत पवारांनी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका मांडली होती. या भूमिकेला केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा प्रयत्न झाल्यास तो उधळून लावला जाईल, असा इशाराच आठवले यांनी दिला. दुसरीकडे, ही मुलाखत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही खटकलेली दिसते. वयाच्या 70व्या वर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला होता. 2000 साली 1992-93मधील अग्रलेखावरून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न होते. पण, ते प्रयत्न रोखण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत, मग् तेव्हा बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे होती? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. मी चोरूनही मुलाखत बघितली नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

जाती आहेत तोपर्यंत आरक्षण राहील : आठवले
बुधवारच्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते, की समाजातील वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र, आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याशी आपण अनुकूल असल्याचेही पवारांनी सांगितले होते. पवारांच्या या विधानावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीकात्मक प्रतिक्रिया दिली. जोपर्यंत जाती आहेत, तोपर्यंत जातीआधारित आरक्षण राहणारच. पण, जर सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा प्रयत्न झाला तर तो डाव उधळून लावल्या जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या मुलाखतीत पवारांनी राज्यात जातीआधारित संघटना सक्रीय झाल्या असून, त्याला सत्तेतील काही घटकांचे प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले होते. मात्र, महाराष्ट्र या विचारांनी नव्हे तर शाहू-फुले-आंबेडकर यांच्याच मार्गाने पुढे जाईल, असेही पवारांनी स्पष्ट केले होते.

बाळासाहेबांचे विचार कळायला पवारांना 50 वर्षे लागली : ठाकरे
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरे-शरद पवार मुलाखतीबद्दल विचारले असता त्यांनी, मी चोरूनही ही मुलाखत बघितली नाही, असे सांगितले. जातीय आरक्षणाऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण द्या, अशी बाळासाहेबांची 50 वर्षांपूर्वीची भूमिका होती. प्रत्येक जातीत पोट असते, पण आता जातीवर पोट आणू नका, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. ही भूमिका समजायला शरद पवार यांना 50 वर्षे लागली असा जोरदार चिमटाही ठाकरे यांनी काढला. शिवसेनाप्रमुखांनी घेतलेली भूमिका त्याचवेळी स्वीकारली असती तर आज समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या राहिल्या नसत्या. मराठी माणूस एकत्र राहिला असता, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.