इंदापूर । सध्या भारतात लिंग गुणोत्तरचे प्रमाण पाहिल्यास, मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. मुलींचा जन्मदर खूपच कमी आहे. त्यामुळे भारतामध्ये बर्याच समस्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. भारतात जोपर्यंत मुले आणि मुलींची संख्या एकसमान होत नाही, तो पर्यंत ही बेटी बचाव जन आंदोलन चळवळ थांबवली जाणार नाही, असे बेटी बचाओ जनआंदोलनाचे प्रवर्तक डॉ. गणेश राख यांनी सांगितले. इंदापूर डॉक्टर संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने इंदापूर बेटी बचाओ जनजागृती जनआंदोलन मशाल रॅली काढण्यात आली होती. यश हॉस्पिटल, बाबा चौक, मेन रोड, नेहरू चौक, कचेरी, श्रीराम चौक मार्गे मार्गक्रमण करत डॉ. नितू मांडके आय एम ए हाऊसजवळ ती विसर्जीत करण्यात आली. त्यावेळी राख यांनी सांगितले.
या बेटी बचाओ जनआंदोलनामध्ये इंदापूर, माढा, फलटण, बारामती, भिगवण येथील 300 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता तर इंदापूर लायन्स क्लब, इंदापूर डॉक्टर असोसिएशन, इंडियन मेडीकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर तसेच मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी, सामाजिक सेवा संघटनांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी सविता व्होरा यांनी ’मुलगी वाचवा’ यावर व्याख्यान दिले. तर शितलादेवी मोहिते पाटील, डॉ. एम. के. इनामदार, डॉ. जे. पी. पोळ, डॉ. अविनाश पाणबुडे, डॉ. लालासाहेब गायकवाड यांची देखील भाषणे झाली.
18 वर्षापर्यंतच्या मुलींची सोनोग्राफी इथून पुढे रामसिता डायग्नोस्टिक सेंटरमध्ये मोफत करून देणार आहोत. इंदापूर तालुक्यातील रुग्णालयात मुलगी झाली तर सवलतीमध्ये उपचार, तपासणी, आणि औषधे देण्यात येणार आहेत, असे बेटी बचाओ आंदोलनाचे आयोजक डॉ. बाळासाहेब राऊत यांनी सांगितले.
विविध पोस्टरमधून जनजागृती
जनजागृती रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने लोकांचा सहभाग होता. त्यामध्ये बेटी बचाओ संदर्भात विविध पोस्टर, मशाल, घोडे, हलग्यांचा कडकडाट तसेच महिलांचा देखील मोठ्या संख्येने समावेश होता. या जनजागृती रॅलीसाठी डॉ. राख, डॉ. राम अरणकार, डॉ. नितीन सावंत, डॉ.मनोज वाघमोडे, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. सदाशिव चंदनशिवे, डॉ.अमोल रासकर, डॉ. विनोद राजापुरे, मंगेश पाटील, निकिता पाटील, शिवदीप कुंद्रे तसेच तालुक्यातील सर्व डॉक्टर, नागरिक व नर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अविनाश पाणबुडे यांनी केले.