धुळे । खालवत जाणारा मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, यासाठी येणार्या सार्वजनिक गणेशोत्सवात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करुन जनजागृती करण्याच्या सुचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एम.पी.सांगळे यांनी आज दिल्या. जिल्हा रुग्णालयात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या व्दिमासिक सभेत श्री.सांगळे बोलत होते. यावेळी जिल्हा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.अरुण मोरे, कायदे सल्लागार ललीत गायकवाड, सदस्य चंद्रकांत चौधरी, सदस्या जयश्री शहा, मिरा माळी, आदि उपस्थित होते.
…तर कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील
सभेत मार्च व एप्रिल 2017 राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेतंर्गत एम.टी.पी. सोनोग्राफी तसेच बॉम्बे नर्सिंग होम या जिल्हा शल्यचिकित्सक, धुळे यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी करण्यात आली होती. यातील 75 केंद्रापैकी 5 एम.टी.पी. केंद्रधारकांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर नोटीसीच्या अनुषंगाने प्राप्त खुलाशांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने शिंदखेडा येथील साईदत्त हॉस्पीटल यांचे एम.टी.पी. केंद्राची मान्यता रद्द करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. तर येऊ घातलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात बेटी बचाव बेटी पढाव बाबत स्पर्धा तसेच उत्कृष्ट देखावा सादर करणार्या मंडळास पारितोषिक देण्याबाबत सर्वानुमते मान्यताही देण्यात आली. सोनोग्राफी केंद्रामार्फत करण्यात येणार्या गर्भवती महिलांच्या बाबतीत एफ फॉर्म ऑनलाईन भरणे बंधनकारक आहेत ऑनलाईन भरण्यास अडचण निर्माण झाल्यास ऑफलाईन फॉर्म भरून संबंधित पिसीपीएनडीटी कार्यालयात सादर करावे. अशाबाबतीत एफ फॉर्म न भरता गर्भवती महिलांची सोनोग्राफी केल्यास ते कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील अशा सुचना समिती अध्यक्ष डॉ.अरुण मोरे यांनी यावेळी केल्या.