जळगाव। संपुर्ण देशाला मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. बुरसटलेल्या मानसिकतेमुळे मातेच्या गर्भातच स्त्रीअर्भक नष्ट करण्यात येत आहे. हे प्रकार रोखणे गरजेचे असून मुलींचे जन्मदर वाढविण्यासाठी प्रत्येकांने वैयक्तिकरित्या प्रयत्न करायला हवे असे आवाहन जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी केले. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. छत्रपती शाहू महाराज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कुटुंब कल्याण कार्यकमाचे उद्दिष्ट गाठण्याचे सर्वोपरी प्रयत्न करण्याबाबत तसेच लोकसंख्या वाढीबाबत, लोकसंख्या स्थिरीकरण, कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर करणे, पाळणा लांबविण्याच्या पध्दतीचा वापर करण्यासंबधी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणार्या प्रथम तीन वैद्यकीय अधिकारी, अधिक्षक, परिचारीका, आरोग्य सहाय्यक,सहाय्यीका यांचा गौरव करण्यात आला. तसेच ज्या दांम्पत्यांनी एका मुलीवर कुटुंब नियोनाची शस्त्रक्रीया केलेली आहे. अशा दांम्पत्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य सभापती दिलीप पाटील, आरोग्य अधिकारी बी.आर.पाटील, डॉ.संजय चव्हाण, डॉ.किरण पाटील, डॉ.समाधान वाघ आदी उपस्थित होते.