60 हजाराच्या दागिण्यांसह 5 हजाराची रोकड लंपास
जळगाव- मुलीच्या लग्नात जेवणादरम्यान रत्नप्रभा वासुदेव आंधळे वय 50 रा. गांधीपुरा, जोहरीगल्ली, एरंडोल यांची 65 हजाराचा ऐवज असलेली पर्स लांबविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4.20 वाजेदरम्यान शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयात घडली. चोरटी दोन मुले सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याच्या शोधार्थ पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान रत्नप्रभा आंधळे या प्रसिध्द कवी वा.ना.आंधळे यांच्या पत्नी असून लाडवंजारी मंगल कार्यालयातून ऐवज लांबविल्याची सलग दुसरी घटना आहे.
एरंडोल शहरात कवी प्रा. वा.ना.आंधळे हे पत्नी रत्नप्रभा, मुलाग निखील, मुलगी विशाखा व सायली यांच्यासह वास्तव्यास आहे. 28 रोजी मुलगी विशाखा हिचा शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. या सोहळ्यासाठी कुटुंबिय दुपारी 12.30 वाजता मंगल कार्यालयात होते. लग्न समारंभ आटोपपल्यावर जेवणाचा कार्यक्रम सुरु होता. रत्नप्रभा ह्या सुध्दा नातेवाईकांसोबत जेवणासाठी बसले. व्याहीन यांना जेवणाचा घास भरविण्यासाठी उठले असता, सोबतची पर्स त्यांनी रिकाम्या खुर्चीवर ठेवली. व्याहीन बाई यांना घास भरवित असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने रत्नप्रभा यांची रोकड व दागिणे असलेली पर्स लांबविली.
पर्समध्ये काय होता ऐवज
या पर्समध्ये 4 तोळे सोन्याचा 40 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, 11 ग्रॅमची सोन्याची 15 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, 5 ग्रॅमचे सोन्याचे कानातले टॉप्स, व 5 हजार रुपये रोख असा एकूण 65 हजाराचा ऐवज पर्समध्ये होता. याप्रकरणी रत्नप्रभा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद
पर्स लांबविल्याचा प्रकार मंगल कार्यालयातील सीसीटीव्हीत कॅमेर्यात कैद झाला आहे. यात नव्या हिरव्या रंगाच्या पट्टे असलेल्या शर्टमध्ये फिरतांना दिसतोय. काही वेळाने तो रत्नप्रभा जेवत असताना त्याच्या पाठीमागे उभा असतांना, यानंतर बाहेर पडतांना व आतमध्ये प्रवेश करतांना दिसून येत आहे. माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. सीसीटीव्ही फुटेजनुसार तत्काळ बसस्थानक गाठले. याठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व दोन ते तीन तरुणांची चौकशी केली. उशीरा एमआयडीसी पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले होते, त्याच्याकडून चौकशी सुरु होती.
चोरट्यांना नवा फंडा
मंगल कार्यालयात ऐवज असलेली पर्स, बॅग चोरीचा नवा फंडा, चोरट्यांनी शोधून काढला आहे. यासाठी चोरटे कुणालाही संशय होणार नाही म्हणून अगदी टापटीप अशा पोषाखात येतात. लग्नातील प्रमुख व्यक्ती महिला हिच्यावर लक्ष ठेवतात. तिचे लक्ष विचलित होतात, चोरटे पर्स लांबवित असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारीच लाडवंजारी मंगल कार्यालयातून 42 हजाराचा ऐवज असलेली बॅग लांबविल्याची घटना घडली. मात्र ही बॅग एमआयडीसी परिसरात आढळून आली होती. यानंतर सलग दुसर्या दिवशी पर्स लांबविल्याची घटना घडली.