मुलीला पळवून तिला गल्ली ते दिल्ली फिरविणारा तरुण जाळ्यात

0

मुलाने मजेसाठी घरुन घेतले 60 हजार रुपये 

रावेरच्या नातेवाईकाकडून मुलीसह ताब्यात

जळगाव- शहरातून एका परिसरातील रहिवासी पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले व तिला घेवून तरुण तुळजापूर, दिल्ली, कोल्हापूर हिंडला. मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल होताच रामानंदनगर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून रविवारी रावेरला नातेवाईकाकडे असलेल्या तरुणाला मुलीसह ताब्यात घेतले आहे. महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या मुलीला पाहताच रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.

देवेंद्रनगरातील रहिवासी तरुण हिमांशू महेंद्र हिंगोणेकर (वय 20 ) हा एका महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या पोलिसाची अल्पवयीन मुलगी पळविली होती. अल्पवयीन असल्याने याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात 21 जानेवारी रोजी हिमांशू विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

मजा-हजासाठी घरुनच घेतले 60 हजार
हिमांशूने मुलीला घेवून बाहेर फिरण्यासाठी त्याच्या घरुनच 50 ते 60 रुपये घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मुलीला सोबत घेत तो दिल्ली, कोल्हापूर, तुळजापूर या देवदर्शनासह इतर ठिकाणी हिंडला. येथून फिरुन आल्यावर तो त्याच्या रावेर येथील नातेवाईकाकडे आल्याची गोपनीय माहिती तपासअधिकारी पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कर्मचार्‍यांना सोबत घेत रावेर गाठले. तेथून हिमांशूसह तरुणीला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधत तिला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. महिनाभरापासून घरुन गायब असलेल्या मुलीला पाहताच तिला जवळ घेत आईने तिला मिठी मारली. यावेळी अश्रू अनावर झाले होते. दरम्यान तरुणाने तरुणीसोबत काही अनुचित कृत्य तर केले नाही, या संशयावरुन पोलिसांनी रविवारी सायंकाळी मुलीसह हिमांशूची वैद्यकीय तपासणी केली होती. उशीरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.