मुलुंडच्या दिशेने पर्यायी रस्ता बनवण्याची गरज

0

नवी मुंबई । ठाणे बेलापूर महामार्गावरील घणसोली नाक्यावर बांधण्यात येणार्‍या उड्डाणपुलामुळे भविष्यात वाहतूक जलद होईल, अशा प्रकारची अटकळ व्यक्त केली जात आहे. परंतु, रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्या समोर एरोलीच्या दिशेने जाणारा रस्ता एकेरी असल्यामुळे येथे वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता असल्यामुळे घणसोली उड्डाणपूल जरी पूर्ण झाला तरी वाहतुकीचा खोळंबा होणारच, अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती दिसून येत आहे. यासाठी मुलुंडच्या दिशेने पर्यायी रस्ता बनवण्याची गरज आहे, तरच वाहतुकीचा खेळखंडोबा होणार नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. घणसोली येथे वाहतुकीचा प्रश्‍न नेहमीच मोठा होतो म्हणून दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्रादेशिक विभागाने 64 कोटी रुपये खर्च करून घणसोली नाका ते नोसिल नाका यादरम्यान उड्डाणपुलाची निर्मिती सुरू केली आहे. काही महिन्यांतच हा पूल वाहनांसाठी खुलाही केला जाईल. परंतु, वाहतुकीचा प्रश्‍न मात्र जसा आहे तसाच राहील, अशा प्रकारचे मतप्रवाह चालक वर्ग व्यक्त करत आहेत.

उड्डाणपुलाची गरज भासत आहे
रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर एक चिंचोळा रस्ता मुलुंड कडे जातो तर एक रस्ता ठाण्याच्या दिशेने जातो. आजही येथे वाहतुकीचा प्रश्‍न भयानक झालेला आहे. जर भविष्यात घणसोली पूल वाहतुकीसाठी खुला झाला तर वाहने जलद गतीने रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ पोहोचतील. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण होईल, असे चालक किशोर डोईफोडे यांनी सांगितले.

यासाठी शासनाने व मनपाने याचा अभ्यास करून रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्या समोरून थेट उड्डाणपूल ऐरोली ब्रीजपर्यंत बांधण्याची गरज आहे किंवा भारत बिजली कंपनी समोरून ऐरोली ब्रीजपर्यंत उड्डाणपुलाची गरज भासत आहे. जर उड्डाणपूल बांधला गेला नाही तर वाहतुकीचा प्रश्‍न जसा आहे तसा राहील किंवा त्यापेक्षा उग्र रूप धारण करेल अशा प्रकारचे भाकीत नगरसेवक मनोज हळदणकर यांनी केले आहे. याबाबत मनपाचे शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.