मुलुंडमधील मुलाचे अपहरण करणार्‍यास अटक

0

मुंबई : मुलुंड येथून चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करणार्‍या एका आरोपीस आज सकाळी मुलुंड पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. शंकर छागुराम यादव असे या आरोपीचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी राज्य गुन्हे प्रकटीकरण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. जानेवारी महिन्यांत या मुलाचे अपहरण झाल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांसह त्यांच्या विरोधकांविरुद्घ मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका केली होती.

या याचिकेनंतर या गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे प्रकटीकरण विभागाकडे सोपविण्यात आला होता. रणवीरसिंग उत्तमसिंह रावत हे मुलुंड परिसरात राहत असून ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांना चौदा वर्षांचा एक मुलगा आहे. 2 जानेवारी 2017 रोजी या मुलाचे काही अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. हा मुलगा अचानक मिसिंग झाल्याने त्याच्या वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्याच्या मित्रांकडे तसेच नातेवाईकांकडेही विचारपूस केली, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर त्यांनी मुलुंड पोलिसांत त्यांचा मुलगा मिसिंग झाल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. मात्र मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. तपासात रणवीरसिंह यांचे मुलुंड परिसरात एक जागा असून या जागेवर त्यांचे त्यांच्या विरोधकांशी वाद सुरु होता. याच वादातून त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा होत असल्याने त्यांनी एक याचिका सादर करुन त्याचा तपास राज्य गुन्हे प्रकटीकरण विभागाकडे सोपविण्याची विनंती केली होती.

या याचिकेत त्यांनी पोलिसांसह विरोधकांवर गंभीर आरोपही केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास गुन्हे प्रकटीकरण विभागाकडे सोपविण्यात आला होता. मात्र मुलुंड पोलिसांनी आपला तपास सुरुच ठेवला होता. हा तपास सुरु असतानाच हा मुलगा गोरेगाव परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल वालझाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या पथकातील दिवाकर शेळके, केशवकुमार कसार, लतार सुतार, महेंद्र पुरी, संतोष तपासे, वैभव पानसरे, गंगाधर गायकवाड, तुकाराम घाडगे, ईश्‍वर पुकळे, आनंदा निलवे, तायडे, किंद्रे, नाना धुळणाकर, खराटे, निलेश सावंत, कमलाकर चव्हाण, संतोष सावंत यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून या मुलाची सुखरुप सुटका केली. तसेच त्याचे अपहरण करणार्‍या शंकर यादव या तरुणाला अटक केली. शंकर हा मुंबई सेंट्रल येथील मदनपुरा परिसरात राहत असून त्याने या मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याचा ताबा गुन्हे प्रकटीकरण विभागाला सोपविण्यात आला आहे.