पुणे । डिजिटलायझेशनमुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र अजूनही पारंपरिक साधनांनीच ज्ञानाची पायरी चढत आहेत. या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण डिजिटल व्हावे, यासाठी पुण्यातील महिलांनी एकत्र येत मुळशी येथील नांदगाव येथे डिजीटल क्लासरुमची सुरुवात केली. डिजिटल क्लासरुम असणारे नांदगाव हे मुळशी तालुक्यातील पहिलेच गाव ठरले आहे.
60 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व
निरंजन सेवाभावी संस्थेच्या सिद्धीता महिला गटाच्या वतीने मुळशी तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 60 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दगडूलाल बाहेती, उद्योजक संजय बिहाणी, नांदगावचे उपसरपंच चेतन फाले, कर्नल डॉ. गिरीजाशंकर मुंगली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सुभाष बेंडगुळे, सुचेता तोष्णीवाल, माधुरी तुपे आदी उपस्थित होते. शैक्षणिक पालकत्वांतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, दप्तर, वह्या, हस्तकलेचे साहित्य, छत्री, चित्रकलेचे साहित्य, बूट आणि इतर आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले.
निधीची कमी पडणार नाही
आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. परंतु समाजातील सर्वच मुलांना शिक्षणासाठी चांगले आणि आवश्यक साहित्य मिळत नाही. निरंजन सिद्धिता महिला गटाच्या वतीने दर्जेदार शालेय साहित्यांचे वाटप ग्रामीण भागातील मुलांना करण्यात आले, याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या या कार्याला कोणताही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दगडूलाल बाहेती यांनी दिली.
सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील
शहरापासून दूर असलेल्या गावांमध्ये शिक्षणांच्या सर्व सुविधा उपलब्ध नसतात. ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या शैक्षणिक सोयी मिळाल्या तर, शहरातील मुलांना मागे टाकून पुढे जाण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, असे सुरेश निंबाळकर यांनी सांगितले. संजय बिहाणी म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. निरंजन सिद्धीता गटाने हाती घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले. हर्षल लढे यांनी सूत्रसंचालन केले. भारती होले यांनी आभार मानले.