हिंजवडी ः शेतात खड्डा खोदून पुरून त्यावर काटेकुटे टाकलेल्या अवस्थेत सात दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक हिंजवडी जवळ माण येथे मुळा नदीच्या किनारी आढळले आहे. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 16) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे. मोहन आनंदा राक्षे (वय 35, रा. राक्षे वस्ती, माण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राक्षे यांची माण गावात मुळा नदीच्या किनारी शेती आहे. 10 जानेवारी रोजी ते त्यांच्या शेतावर गेले होते. त्यानंतर, गुरुवारी (दि. 16) सकाळी आठच्या सुमारास शेतीला पाणी देण्यासाठी ते शेतावर गेले. नदीच्या किनारी जाऊन पाण्याचा पंप सुरु करत असताना त्यांना त्यांच्या शेतात जमीन खोदलेली आढळून आली. राक्षे यांनी खोदलेल्या जमिनीच्या भागाची पाहणी केली असता तिथे जमीन खोदून त्यामध्ये पांढर्या कापडात काहीतरी असल्याचे आढळले. त्यावर अज्ञातांनी झाडाच्या फांद्या आणि काटे टाकले होते. राक्षे यांनी झाडाच्या फांद्या आणि काटेकुटे बाजूला करून जमीन पुन्हा खोदून पांढरे कापड बाहेर काढले असता त्यामध्ये सात ते आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यांनी तात्काळ हिंजवडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेऊन अर्भकाची उत्तरीय तपासणी केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.