मुळीक यांनी मारली बाजी!

0

पुणे । महापालिकेच्या 2018-19च्या स्थायी समिती अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले असून त्यात भाजपच्या योगेश मुळीक यांनी बाजी मारली आहे. मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांना पराभूत केले आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत मुळीक यांना 16 पैकी 10 मते मिळाली, तर लक्ष्मी दुधाणे यांना केवळ 5 मतांवर समाधान मानावे लागले.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मावळते स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि पिठासीन अधिकारी शेखर गायकवाड तसेच पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेत भाजपचे 162 पैकी 98 नगरसेवक आहेत. या संख्या बळानुसार महापालिकेतील स्थायी समितीसह इतर समित्यांवरदेखील भाजपच्या नगरसेवकांना काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यातील स्थायी समिती ही सर्वांत महत्त्वाची असून यातून शहराचा गाडा हाकला जातो. या समितीमधील 16 पैकी 10 सदस्य हे भाजपचे आहेत.

पंधरा दिवसांपूर्वीच चिठ्ठी काढण्यात आली, त्यातून आठ सदस्य समितीतून बाहेर पडले. त्यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळींना बाहेर निघावे लागले. त्यानंतर पुन्हा आठ नव्या सदस्यांची सर्व साधारण सभेत नियुक्ती करण्यात आली. त्यात प्रामुख्याने आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर, आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांची नियुक्ती झाली. यामुळे दोन्ही आमदारांच्या घरातील मंडळी स्थायी समितीमध्ये आल्याने यांपैकी कोणाला स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळते याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.