मुसळधार पावसाने लोणावळा परिसर जलमय

0

24 तासात 285 मिमी पाऊस

लोणावळा : मुसळधार पावसाने लोणावळा परिसर जलमय झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोणावळा शहरात मागील 24 तासात तब्बल 285 मिमी पाऊस झाला आहे. शनिवारी रात्रीपासून लोणावळा परिसरात पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. शहरात 4 जुलैपासून संततधार पाऊस सुरु असून या पावसाने शनिवारी रात्रीपासून रौद्र रुप धारण केल्याने अवघ्या 24 तासात 285 मिमी एवढा पाऊस झाला असून पावसाचा जोर आज देखील कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. पवना धरण परिसरात मागील 24 तासात 154 मिमी पाऊस झाला असून धरणात 63.17 टक्के पाणीसाठा झाला आहे. मावळ तालुक्यातील वाडिवळे धरण 77.16 टक्के, आंद्रा धरण 78.31 टक्के तर कासारसाई धरण 81.20 टक्के भरले आहे.

घराबाहेर न पडण्याचे आवाहन
मुसळधार पावसामुळे लोणावळा व मावळ भागातील ओढ्यानाल्यांना पुराचे स्वरुप आले आहे. धबधबे ओसंडून वाहत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच पर्यटकांनी देखील डोंगरभागातील धबधबे तसेच पर्यटनस्थळांवर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भुशी धरण व लायन्स पॉईंटकडे जाणार्‍या रस्त्यावरुन पाणी वाहत आल्याने त्या भागात कोणीही जाण्याचा प्रयत्न करु नये. लोणावळा शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. पावसामुळे द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.

पावसाने दोन हजाराचा टप्पा ओलांडला
शहरात आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत असून रविवारी सकाळ अखेर पावसाने दोन हजारी टप्पा ओलांडला असून, येथे रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 2106 मिलिमीटर एवढया पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहरात शनिवारी दिवसभर आणि रात्री पडलेला एकूण पाऊस 136 मिलिमीटर इतका नोंदविला गेला असून रविवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाने लोणावळा शहर आणि परिसराला झोडपून काढले आहे. लोणावळा शहरात आणि परिसरात पडत असलेल्या पावसामुळे शहरातील नदी नाले ओसंडून वाहत असून येथील सखल भागातील अनेक रस्त्यांवर पाणी भरले आहे. शिवाय वलवन, लोणावळा, तुंगार्ली या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील पंधरवड्यापासून सतत पडत सतत पडत असलेल्या पावसामुळे स्थानिक नागरिक आता त्रस्त झाले असले तरीही येथे येणारे पर्यटक मात्र या पावसाचा आनंद लुटत आहे. शहरालगत असलेल्या डोंगराळ भागातून वाहणार्‍या प्रत्येक छोट्यामोठ्या धबधब्यांवर तसेच भुशी धरणाच्या पायर्‍यांवरून फेसळत वाहणार्‍या पायर्‍यांवर ही पर्यटक मंडळी मौजमस्ती करताना दिसून येत होती.

ट्रेकसर्र् आणि पावसाळी पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणस्थळ असणार्‍या राजमाची किल्ला परिसराला रविवारच्या वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे येथे आलेले पर्यटकही काही काळ गांगरून गेले होते. मात्र तरीही येथील दाट परसरलेले धुकं आणि हे धुकं निवळून जाताच हिरव्यागार निसर्गाचे सौन्दर्य निरखत त्यात हरवून जाण्याची मजा हे ट्रेकर्स, पर्यटन मोठ्या आनंदात घेत होते.