मुस्लिमांचं नेमकं कुठं चुकतंय?

0

भारतात मतांसाठी मुस्लिमांचं लांगुलचालन करणारे सर्व पक्षीय राजकारणी मुस्लिमांचं कधीच भलं करू शकत नाहीत. शिक्षणातून मुस्लिमांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होऊ शकेल. परंतु, याबाबतही मुस्लिमांची स्थिती शोचनीय आहे. या दुरवस्थेतून मुस्लिमांची सुटका कशी होणार? कोण करणार? कुणाचीही वाट पाहण्यापेक्षा राजकारण्यांच्या जहाल विचारांना जवळ करण्याऐवजी शिक्षणाला जवळ केल्यास उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. मुस्लीम तरुणतरुणी शिक्षणाची कास धरतील काय?

राज्यात नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. पाठोपाठ उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यात. या निवडणुकात मुस्लिमांच्या मतांना खूप महत्त्व प्राप्त झालं होतं. उत्तर प्रदेशात मुस्लिमांची लोकसंख्या 20 टक्के आहे. मुस्लिमांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असली, तरी उत्तर प्रदेशात मुस्लिमांची स्थिती फारशी चांगली नाही, बरेचसे मुस्लीम मागास आणि गरीब आहेत. उत्तर प्रदेशच नव्हे तर भारतातल्या सगळ्याच राज्यातील मुस्लिमांची हीच स्थिती आहे.

मुस्लिमांची ही दुर्दशा होण्याचं सर्वात प्रमुख कारण शिक्षणाचा अभाव हे आहे. अनेक मुस्लीम कुटुंबीय आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घ्यायला पाठवतात. तिथे कट्टरपंथीय मौलवी त्यांना इस्लामच्या नावाने भडकवतात. ‘नॉलेज इज द पॉवर’ हे नव्या युगाचं सूत्र आहे. परंतु, अशा नॉलेजपासूनच मुस्लीम दूर राहतात. त्याऐवजी ते राजकारण्यांच्या नादी लागतात. परंतु, कोणताच राजकारणी आपला उद्धार करू शकत नाहीत हे त्यांना उमगत नाही. शिक्षणाचा फायदा कसा होईल, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अझीम प्रेमजी! अझीम यांच्या वडिलांचा तांदूळ आणि तेल-तुपाचा व्यवसाय होता. त्यांनी दाढी वाढवलेली नसली, तरी ते कट्टर मुस्लीम होते, पण त्यांनी अझीम यांना खूप शिकवलं. आज अझीम यांचं नाव फॉर्ब्जच्या बिलियॉनरच्या यादीत पोहोचलं आहे. अझीम यांच्यामुळे त्यांच्या एक लाखाहून अधिक कर्मचार्‍यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदा होतोय. या कर्मचार्‍यामध्ये केवळ मुस्लीमच आहेत असं नाही. कारण आऊटसोर्सिंगसारख्या कामात धर्म किंवा जात नव्हे, तर तुमचं शिक्षण हीच तुमची पात्रता असते.

आज भारतातील नव्हे, तर पाकिस्तानामधील मुस्लिमानीही आत्मपरीक्षण करायला हवं. ‘ज्ञान हीच सत्ता’ असा विचार करून भारत पाकिस्तानातील मुस्लीम एकत्र आले, तर त्यांची अफाट प्रगती होईल. भारत-पाकिस्तानाचा जगभर डंका वाजेल. पण परिस्थिती खूप वेगळी आहे. खरं शिक्षण घेण्याऐवजी मुस्लीम धार्मिक शिक्षणाच्या मागे जाताहेत. शाळा, कॉलेजमध्ये शिकत असलेलेही मदरशांकडे वळत आहेत. दाढी ही त्यांना आपली आयडेंटिटी वाटते. आता दाढी ठेवल्याने कुणाची कार्यक्षमता वाढलीय का? धर्म मनात असला पाहिजे, त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नाही.

मुस्लिमांचं दुखणं मांडणारी काही पुस्तकं वाचण्यात आली. त्यापैकी पहिलं पुस्तक आहे, ‘फ्रंटलाइन पाकिस्तान-द स्ट्रगल विथ मिलिटन्ट इस्लाम’.झाहिर हुसेन त्याचे लेखक आहेत. ‘डेस्पिरिटली सिंकिंग पेराडाईज’ या दुसर्‍या पुस्तकाचे झियाउद्दीन सरदार हे लेखक आहेत, तर तिसरं पुस्तक आहे, डॉ. रफिक झकेरिया यांचे ‘इंडियन मुस्लीम-व्हेअर हॅव दे गॉन रोंग?’. डॉ. झकेरिया यांनी आपल्या पुस्तकात मुस्लिमांमध्ये असलेल्या शिक्षणाच्या दुरवस्थेविषयी आकडेवारी आणि विश्‍लेषण दिलंय. ते भारत आणि पाकिस्तानातील प्रत्येक मुस्लिमांनी वाचण्यासारखे आहे. ‘पाकिस्तान प्रेस इंटरनेशनल’चे लेखक आमिर लतीफ म्हणतात, पाकिस्तानात शिक्षणाची अवस्था अलार्मिग आहे. धोक्याचा इशारा द्यावा, अशी आहे. सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानात शिक्षणाचं प्रमाण केवळ 46 टक्के आहे, तर मुलींमध्ये साक्षरतेचं प्रमाण केवळ 26 टक्के आहे. प्रौढ स्त्रिया आणि लहान मुलींचा यात समावेश केला, तर हेच प्रमाण 12 टक्के आहे.

युरोपात शंभर टक्के साक्षरता आहे. अमेरिकेत 99 टक्के लोक साक्षर आहेत, तर स्त्रीसाक्षरतेचं प्रमाण शंभर टक्के आहे. पाकिस्तानात 1 लाख 63 हजार प्राथमिक शाळा आहेत. त्यातील केवळ 40 हजार शाळांमध्येच मुलींना शिक्षण दिलं जातं. नॉर्थवेस्ट फ्रँटीयरमध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी आहे. पाकिस्तानातील 95 टक्के लोक इस्लामचं पालन करतात. इस्लाममध्ये स्त्री आणि पुरुषासाठी समान शिक्षणतत्त्व आहे. पण तरीही मौलवींचा मुलींना शिकण्यास विरोध असतो. पाकिस्तानात एकास बाजूला शाळांची संख्या वेगाने कमी होत असतानाच, दुसर्‍या बाजूला मदरशांची संख्या वाढत चालली आहे. झाहिर हुसेन यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय, ’13 हजार मदरशांपैकी 15 टक्के मदरशांमध्ये फंडामेंटालिझम आणि टेररिझम याचं शिक्षण दिलं जातं. मदरशात इंग्रजी शिकवण्यात येत नाही. तिथे केवळ अरबी भाषेत शिक्षण दिलं जातं. त्यामुळे मुलांना आधुनिक ज्ञान मिळत नाही. आपल्या मुलांना शाळेत शिकण्यासाठी न पाठवू शकणारे गरीब आईवडील या मदरशांच्या चक्रात सापडतात.

थोड्या फार फरकाने हीच स्थिती भारतातही आहे. रफिक झकेरीया यांच्या पुस्तकात भारतीय मुस्लिमांच्या हलाखीचे करुण चित्र आहे. आऊटसोर्सिंगच्या क्षेत्रात भारताने मुसंडी मारलीय. पण आऊटसोर्सिंगमध्ये 1 टक्काही मुस्लीम नाहीत. भारतात जवळपास 20 कोटी मुस्लीम आहेत. बांगलादेशातून आलेल्या निर्वासितांची संख्या मोजली, तर हा आकडा आणखी फुगेल. पण त्यातील एक टक्का मुस्लिमांचाही खर्‍या अर्थाने विकास झालेला नाही. अझीम प्रेमजी (विप्रो), हबीब खोराकीवाला (वोकहार्ड), युनूस गफूर(हिंदुस्तान इंक) अशी काही मोजकी नावं उद्योगक्षेत्रात आहेत. पण उर्वरित मुस्लिमांची अवस्था भयानक आहे. अर्थात, पाकिस्तानी मुस्लिमांच्या तुलनेत काहीबाबतीत भारतीय मुस्लिमांची अवस्था बरी आहे. समजूतदार मुस्लीम आपल्या मुलांना शिकवतात. मुलीही भारतात उच्च शिक्षण घेत आहेत. सर्व क्षेत्रांत त्या उतरत आहेत. पण त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे हरखून जाण्याची गरज नाही.

भारतात पदवी संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये फक्त 6.21 टक्के मुस्लीम आहेत. एमएस्सी आणि एमकॉमची डिग्री मिळवणार्‍या मुस्लीम विद्यार्थ्याचं प्रमाण 9.11 टक्के आहे. प्रोफेशनल डिग्री कोर्समध्ये केवळ 3.41 टक्के मुस्लीम आहेत, तर एलएलबी आणि इंजिनीअरिंगमध्ये 5.36 टक्के मुस्लीम आहेत. जे मुस्लीम शिकले त्यांची प्रगती झालीय. नोकरी, उद्योग, राजकारण या सगळ्याच क्षेत्रात मुस्लीम निव्वळ शिक्षणाच्या अभावामुळे पिछाडीवर आहेत. भारतात मुस्लिमांची संख्या वीस कोटी असल्याचं सांगितलं जातं असलं, तरी लोकसभेत केवळ सतरा मुस्लीम खासदार आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या 83 इतकी हवी होती. राज्यसभेतील 250 सदस्यांपैकी 11 मुस्लीम आहेत. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाविषयी लिहिण्यासारखी स्थिती नाही.

आयएएस सारख्या उच्च दर्जाच्या नोकरीत मुस्लिमांची संख्या केवळ 3.27 टक्के आहे. आयपीएसमध्ये 2.7 टक्के मुस्लीम आहेत. आयएफएसमध्ये मुस्लिमांचा वाटा 3.37 टक्के आहे. भारत सरकारची कार्यालयं आणि चौदा राज्यांच्या सरकारी नोकरीत एकूण 75 हजार 953 कर्मचारी आहेत. यात मुस्लिमांची संख्या 3 हजार 346 आहे. ही आकडेवारी सुशिक्षित मुस्लिमांचं डोकं फिरावणारी आहे. पण मुस्लिमांच्या या स्थितीला जबाबदार कोण आहेत? सौदी अरेबियासारखे देश भारतातील मुस्लिमांना भरपूर मदत करतात. पण आपलं भलं आपणच करू शकतो, हे जोपर्यंत मुस्लिमांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणं अवघड आहे.

खुदीको कर बुलंद इतना की
खुदा अपने बंदेसे पुछे,
बता तेरी रझा क्या है।
हे मुस्लिमांनी लक्षात ठेवायला हवं..!

हरीश केंची – 9422310609