वॉशिंग्टन । अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सहा मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. या निर्णयास आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा आहे, असे सांगत त्यावर प्रतिबंध घातला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे प्रतिबंध दूर होणार आहेत. जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यावर हा निर्णय घेतला होता. यानुसार यमन, इरान, लिबिया, सिरीया, सोमालिया आणि चाड आदी देशांवर निर्बंध लादले गेले होते. ओबामा यांना मूलतत्त्ववादी इस्लाम हा मुख्य धोका आहे हे समजलेलेच नाही, अशी टीका ट्रम्प यांनी केली.
ट्रम्प मुस्लिमांविषयीच्या वक्तव्यावर ठाम
डोनाल्ड ट्रम्प विरोधकांनी केलेल्या टीकेनंतरही आपल्या मुस्लिमांविषयीच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास प्रतिबंध करण्यात यावा, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. कॅलिफोर्नियातील हत्याकांडानंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते.त्यांच्या अध्यक्षीय प्रचारातील हे सर्वात प्रक्षोभक विधान होते.
काय म्हणाले होते ट्रम्प
दक्षिण कॅरोलिना येथे ट्रम्प यांनी सांगितले, की कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर 9/11 सारखे हल्ले होतील. त्यामुळे मुस्लिमांना देशात प्रवेश करण्यावर बंदी घातली पाहिजे. जनमत चाचण्या काहीही असल्या तरी जेथे द्वेषाची भावना येते, तेथे आपणही त्यांच्याविरोधात निर्धार केला पाहिजे. अमेरिकेतील काही मशिदी बंद केल्या पाहिजेत तर काहींवर लक्ष ठेवले पाहिजे.