मुस्लीम तरुणांनी जपली मानवता

कोरोनाने मयत झालेल्या हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कारावेळी दिला मदतीचा हात

फैजपूर (निलेश पाटील) : कोरोनाच्या कठीण काळात कोरोनामुळे मृत झालेल्या शवाला हात लावण्यासाठी नातेवाईक धजावत नसल्याच्या घटना सर्वत्र घडत असताना भालोदच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मुस्लीम तरुणांनी मात्र पुढाकार घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयापासून तर थेट स्मशानभूमीपर्यंत नेत समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय देत मानवतेचे दर्शन घडवले.

मुस्लीम तरुणांनी घडवले मानवतेचे दर्शन
यावल तालुक्यातील भालोदच्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना बुधवारी सकाळी न्हावी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ.अभिजीत सरोदे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. यावेळी मृत व्यक्तीसोबत केवळ त्यांची पत्नी उपस्थित होती तर अन्य नातेवाईक हे दूरवर राहत असल्याने ते अंत्यसंस्कारासाठ वेळेत पोहोचणे शक्य नव्हते. अंत्यविधीचे सोपस्कार रुग्णालयामार्फत करावे अथवा अन्य पद्धतीने करावे ? असा पेच निर्माण झाला. फैजपूरचे नगरसेवक शेख कुर्बान शेख करीम यांना ही माहिती मिळाताच त्यांनी तातडीने त्यांच्यासोबत चार मुस्लिम तरुण व पालिकेचे सफाई कामगारांना सोबत घेत न्हावी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

मृतदेह हलवला स्मशानभूमीत
मयत झालेल्या हिंदू कोरोना रुग्णाचे लांबवर असलेले नातेवाईक वेळेवर येणार नसल्याने मृताचे पार्थिव न्हावी ग्रामीण रुग्णालयातून स्मशानभूमीत हलवण्यापर्यंत तसेच अंत्यविधी प्रक्रियेसाठी लागणार सहकार्य करून मुस्लीम तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवले. मुस्लिम समाजातील अशपाक कुरेशी, जुबेर बेग, शरीफ खान ,उमर खान, पालिका कर्मचारी मयूर चिरावंडे, अनिल अटवाल आदींनी पीपीई कीट परीधान करीत मयत व्यक्तीला न्हावी ग्रामीण रुग्णालयातुन स्मशानभूमी न्हावीपर्यंत नेण्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर अंत्यविधीच्या सोपस्कारासाठी हातभार लावला.

मयताच्या शालकाने दिला अग्निडाग
मयत रुग्णाच्या पार्थिवाला शालकाने अग्निडाग दिला. यावेळी फैजपूरचे नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक केतन किरंगे, न्हावीचे पोलिस पाटील संजय चौधरी, संजय वाघूळदे यांचीही उपस्थित ीहोती. यावेळी हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मुस्लिम तरुणांनी केलेले सहकार्य माणुसकीचे दर्शन घडविणारे ठरले.