मुस्लीम समाजाने सांप्रदायिक सद्भाव जपणे आवश्यक – डॉ. एस. एन. पठाण

0

12 व्या अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात ‘मुस्लीम तरुणांपुढील आव्हाने’ परिसंवाद

पुणे : देशातील सामाजिक स्थितीवर अकारण भाष्य करण्यापेक्षा धार्मिक आणि जातीय तेढ खर्‍या अर्थाने कमी करावयाची असेल तर मुस्लिमांनी सांप्रदायिक सद्भाव जपणे अत्यंत आवश्यक आहे, असे उद्गार नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी काढले.
मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आयोजित 12 व्या अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी ‘मुस्लीम तरुणांपुढील आव्हाने’ या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या परिसंवादात डॉ. फारुक तांबोळी, अमिर इद्रीसी, मेहबुब काझी, हलिमा कुरेशी, रागिब बहादूर आणि अब्दुल अझीझ पठाण सहभागी झाले होते.

बेजबाबदार पुढार्‍यांमुळे समाजाचे नुकसान

डॉ. पठाण म्हणाले, दुर्दैवाने पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळे देशात हिंदू मुस्लिमांच्या द्वेषाची बीजे पेरली गेली. आज काही पुढारी ‘गले पे छुरी रखे, फिर भी मैं भारतमाता की जय नही कहूँ गा।’ अशी बेजबाबदार विधाने करून हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाचे फार मोठे नुकसान करत आहे. याचे त्यांनी भान ठेवावयास हवे. ‘श्रीराम मंदिर आणि बाबरी मशीद’ हा वाद मुस्लीम समाजातील तरुण पिढीला नको आहे. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, रोजगार व सुसह्य जीवन हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आम्ही-तुम्ही’ भेद संपायला हवा!

कुरेशी म्हणाल्या, ‘आम्ही-तुम्ही’ हा भेद भारतीय समाजातून नाहीसा झाला पाहिजे. धार्मिक देणग्यांतून मुस्लीम युवकाच्या शिक्षणासाठी निधी उभारता येणे शक्य आहे. डॉ. तांबोळी म्हणाले, धार्मिक सलोखा, प्रेम एकतर्फी असू नये. मुस्लीम व्यक्तिरेखांचे चित्रण साहित्य, चित्रपटातून नकारात्मक केले जाऊ नये. वारीच्या मुलाखती मुस्लीम पत्रकार घेत आहेत, दर्ग्यावरच्या दरवेशाच्या मुलाखती कोणी घेणार आहे की नाही, हेही पाहायला लागेल.

योग्य संधीची गरज

मेहबूब काझी म्हणाले, मुस्लिम तरुणात अस्वस्थता, नैराश्य आहे. पण, संविधान आणि घटनेचे हक्क त्याला आहेत. फक्त योग्य संधी मिळायला हव्यात. धार्मिक उरुसांबरोबर शिक्षणाचे उरूस आता भरायला हवेत.
राकीब शेख म्हणाले, मुस्लिम युवकाकडे गुणवत्ता आहे. मात्र त्याला स्व-ओळख, संधी आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे. अझीम पठाण म्हणाले, अन्य धर्मीय युवकांपेक्षा मुस्लिम युवकांपुढे अधिक आव्हाने आहेत. त्याना तोंड देण्यासाठी शैक्षणिक वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. रस्त्यावरच्या संघर्षाबरोबर लेखणीच्या लढ्याची जोड दिली पाहिजे.