मूकबधीर मुलीवर बलात्कार करुन पळून गेलेल्या तरुणाला अटक

0

मुंबई – मूकबधीर असलेल्या एका चौदा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या एका आरोपीस काल गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. अखिलेश बसंतू बसफुर असे या 20 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बलात्कारानंतर अखिलेश हा बोरिवलीतील काम सोडून उत्तर प्रदेशला पळून गेला होता, कुठलाही पुरावा नसताना त्याला अखेर उत्तर प्रदेशातून पोलिसांनी अटक केली.

14 वर्षांची ही पिडीत मुलगी बोरिवली परिसरात राहते. 6 डिसेंबर 2016 रोजी तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या पालकांनी तिला औषधोपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले होते. तिथे तपासणी केल्यानंतर ही मुलगी साडेचार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. या घटनेनंतर तिच्या पालकांनी बोरिवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला होता. ही मुलगी मूकबधीर असल्याने तिच्याशी संवाद साधण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी मूकबधीरांशी संवाद साधू शकणार्‍या जाणकार शिक्षक, सामाजिक संस्थेच्या तज्ञांशी मदत घेऊन तिच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या गुन्ह्यांचा बोरिवलीी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करीत होते. याच दरम्यान पोलिसांनीपरिसरातील बांधकाम साईटवरील सुपरवायझर, मुकादम, बिगारी कामगार, हेल्पर आणि मेस्त्री आदींची माहिती काढण्याचे काम सुरु केले होते. या मुलीवर बलात्कार करणारा त्यापैकीच एक असावा असा पोलिसांना संशय होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता अखिलेश बसफुर नावाचा एक तरुण काही दिवसांपूर्वी काम सोडून त्याच्या उत्तर प्रदेशातील गावी निघून गेल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना समजले होते. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील आनंद रावराणे, मनोहर हरपुडे, रईस शेख, शरद झिने, शेषराव शेळके, नरेंद्र मयेकर, अविनाश शिंदे, रविंद्र भांबिड, अशोक गोळे, किशोर नलावडे, सुधीर कोरगांवकर, विनायक साळुंखे, राजू गारे, राजेश चव्हाण, सुबोध सावंत, संतोष देसाई, दयानंद बुगडे, शाम कापसे, सचिन कदम, राकेश लोटणकर, अजीत चव्हाण आणि शिवाजी दहिफळे यांंनी तीन ते चार पथक तयार करुन त्याचा उत्तर प्रदेशासह इतर ठिकाणी शोध सुरु केला होता. यातील एका पथकाने उत्तर प्रदेशातील महाराजगंज, फरींदा परिसरातून अखिलेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने या मूकबधीर मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणून त्याचा ताबा बोरिवली पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.